Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : जिल्हा बँकेतील भरती होणार पारदर्शक; संचालक मंडळाच्या मनमानीला चाप

Maharashtra News : जिल्हा बँकेतील भरती होणार पारदर्शक; संचालक मंडळाच्या मनमानीला चाप

आयबीपीएस, टीसीएसकडून भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (District Cooperative Bank) कर्मचारी भरतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य सरकारने ही भरती (Recruitment ) प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे जिल्हा बँकांना इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सोनल सिलेक्शन (आयबीपीएस), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि महाराष्ट्र नॉलेज कोर्पोरेशन लि. (एमकेसीएल) यापैकी कोणत्याही एका संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबवावी लागेल. सहकार विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

शासन निर्णयानुसार जिल्हा बँकांना बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवाव्या लागणार आहेत. तर उर्वरित ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि जिल्ह्याबाहेरील उमेदवार (Candidate) पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांमधून भरता येतील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.  

यापूर्वी जिल्हा बँकेतील लिपिक, शिपाई अथवा तत्सम पदांची भरती संबंधित जिल्हा बँकेच्या स्तरावर होत होती. मात्र, या भरतीत आर्थिक गैरव्यवहार तसेच मनमानीपणा होत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या होत्या. तसेच बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ तसेच स्थानिक राजकीय नेत्यांचा भरती प्रक्रियेत हस्तक्षेप होत होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  २०१८ मध्ये भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांनी भरती प्रक्रियेसाठी सात संस्थांचे पॅनल तयार केले होते.

मात्र, पॅनलमधून निवड केलेल्या संस्थेच्या माध्यमातून कर्मचारी भरती करताना काही संस्थांबाबत जिल्ह्यातील आमदार, नागरिक यांच्याकडून तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या आधारे सरकारने सात संस्थांचा समावेश असलेले पॅनल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकांना कर्मचारी भरतीसाठी आयबीपीएस, टीसीएस किंवा एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड करावी लागणार आहे. ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी पदभरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केली आहे त्या बँकांनाही हा निर्णय लागू राहील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Gulabrao Patil : “भाजप पक्ष फोडतो, तसे शिक्षकांनी…”; मंत्री गुलाबराव पाटलांच्या...

0
जळगाव | Jalgaon शिक्षकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी फोडून त्यांना मराठी शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला पाहिजे, असा मिश्कील टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री...