मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
सर्वसामान्य आणि ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात. तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे, यासाठी राज्यातील २१ जिल्ह्यात ४७ नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय ४ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयेही (Collector Office) स्थापन केली जाणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली आणि अंधेरी तालुक्यातील अनुक्रमे चेंबूर, मालाड आणि वांद्रे येथे तर नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यातील नामपूर येथे नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालय सुरु होईल. प्रशासकीय विकेंद्रीकरणाला गती देण्यासाठी राज्यातील चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये चार नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी आणि कर्मचारीवृंद, तालुक्यांचे तसेच जिल्ह्यांचे भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार नवीन कार्यालयांमुळे तहसील आणि जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध महसुली सेवा नागरिकांना त्यांच्या अगदी जवळ आणि सुलभपणे उपलब्ध होतील.




