मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे उघड झाल्यानंतर राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी निवडताना सरकारने विशेष काळजी घेतली आहे. बँकांकडून जमा झालेल्या शेतकरी थकबाकीदारांच्या यादीतील प्राप्तिकर भरणाऱ्यांची यादी प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज, बुधवारी कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीसाठी बँकांकडून माहिती संकलन करण्यात आली असून या माहितीचे विश्लेषण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ५६ लाख शेतकऱ्यांपैकी २५ लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्य सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफी मिळेल, असे सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप कर्जमाफीला मुहूर्त मिळालेला नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी केल्यानंतर ९१ लाख महिला लाभार्थी अपात्र ठरविण्यात आल्या. सध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नसल्याने कर्जमाफी योजना तातडीने राबविण्याऐवजी चाळण लावूनच यादी प्रसिद्ध करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थींनी लाभ उठवला होता. असा घोळ कर्जमाफी योजनेत होऊ नये यासाठी महाआयटी आणि सहकार विभागाने दक्षता घेतली आहे.
शेतकरी करणार पडताळणी
कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बँकांनी संगणकीय प्रणालीत नोंदविलेल्या माहितीची पडताळणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. ही पडताळणी झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर म्हणजे जुलै अखेर प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात होईल, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
मुद्दे
५६ लाख शेतकाऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी
पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी रुपयांची तरतूदप्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम यादी




