बारामती | Baramati
येथील विमानतळ परिसरात आज (रविवारी) दुपारच्या सुमारास प्रशिक्षण देणारे एक शिकाऊ विमान कोसळल्याची (Plane Crash) धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून पायलट सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांतील हा तिसरा विमान अपघात असल्याने बारामतीतील (Baramati) हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान बारामती विमानतळावर (Baramati Airport) जानेवारी महिन्यात विमान कोसळून भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली होती. या घटनेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती.
तांत्रिक बिघाड की हवामान? तपासाला सुरुवात
अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हे शिकाऊ विमान नेमकं कशामुळे कोसळले, तांत्रिक बिघाडामुळे की प्रतिकूल हवामानामुळेयाचा शोध हवाई वाहतूक यंत्रणांकडून घेतला जात आहे.
हवाई सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता
बारामतीत खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थांमार्फत नवख्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांत शिकाऊ विमाने कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे विमानांची देखभाल, चालकांचे प्रशिक्षण आणि बारामती विमानतळावरील एकूणच हवाई सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.




