नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. बेरोजगार तरुणांना चहा टपरी, खाद्यपदार्थ विक्री केंद्र किंवा अन्य छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून मंजूर केले जाणारे अशासकीय ठराव आता बंद करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांत मंजूर झालेल्या अशा स्वरूपाच्या ठरावांचाही फेरआढावा घेऊन ते रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे छोट्या व्यवसायातून रोजगार मिळवू पाहणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिकेत नगरसेवकांची सत्ता असताना प्रभागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विविध प्रस्ताव मांडले जात होते. चहा टपरी, खाद्यपदार्थ विक्री केंद्र किंवा अन्य छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत स्थायी समितीत अशासकीय ठराव मांडले जात.
समितीच्या मंजुरीनंतर संबंधितांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आधार मिळत होता. मात्र, मागील चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत पुन्हा नगरसेवकांची सत्ता आली आणि अशा ठरावांचे प्रस्ताव पुढे येऊ लागले. प्रभागातील बेरोजगार आणि कार्यकर्त्यांना व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू होते.
राज्यातील हवामानत बदल; पुढील दहा दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज
प्रशासनाच्या या निर्णयामुळे छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार तरुणांच्या संधी मर्यादित होणार आहेत. दुसरीकडे, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे ठेवणे आणि वाहतूक सुरळीत राखणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे बेरोजगारांचे रोजगाराचे प्रश्न आणि सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणमुक्त शहराचे नियोजन यामध्ये महापालिका प्रशासन कसा समतोल साधणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
अतिक्रमणमुक्त शहराचे नियोजन
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि पदपथ मोकळे ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. रस्त्यांच्या कडेला किंवा पदपथांवर नव्या टपऱ्यांना परवानगी दिल्यास अतिक्रमणांमध्ये वाढ होऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा नवीन ठरावांना मंजुरी न देण्याची भूमिका घेतल्याचे समजते.




