नाशिक | प्रतिनिधी
राज्यातील हवामानात बदल होत असून, पुढील दहा दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात घट होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल. विशेषतः विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
सध्या राज्यावर जमिनीपासून सुमारे तीन किलोमीटर उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतातील हवेचा दाब वाढल्याने तेथील थंड वारे ईशान्येकडून महाराष्ट्राकडे वाहण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. येत्या पंधरवड्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता नसल्याने राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे आगामी काळात हवामान कोरडे आणि थंड राहणार आहे. ही परिस्थिती रब्बी पिकांसाठी अनुकूल मानली जात आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातम्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, हे जनता ठरवणार…
नाशकात ढगाळ वातावरण
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरीच्या अंदाजानुसार, २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान नाशिक जिल्ह्यात हवामान थंड व कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान २८ ते ३१, तर किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.



