मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा (Walmik Karad) समावेश असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी केला होता. तसेच मंत्री मुंडे यांचा देखील या प्रकरणाशी संबध आहे, असा दावाही त्यांनी केला होता.
अशातच काही दिवसांपूर्वीच सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे मनोज जरांगेसह (Manoj Jarange) विरोधकांनी आमदार सुरेश धस यांना लक्ष केले आहे. तसेच यानंतर आमदार धस यांनी स्वत: या भेटीबद्दल स्पष्टीकरण देत आपण धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे त्यांनी मान्य केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की,”कोण कुणाला भेटले याच्यावर जर अशा पद्धतीचा राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. सुरेश धस यांनी या प्रकरणांमध्ये गंभीर भूमिका घेतलेली आहे. ती सर्वांनी बघितली आहे. ते गंभीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा असे करणे योग्य नाही. शेवटी धनंजय मुंडे हे सुद्धा राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एखादा आमदार, एखाद्या मंत्र्याला भेटला तर काही फरक पडत नाही, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,” सुरेश धस यांनी देखील सांगितलं आहे की धनंजय मुंडेंची भेट घेतली असली तरी कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्य़ांना शिक्षा (Punishment) झाली पाहिजे हाच हेतू समोर ठेवून काम करत आहेत. पण काही लोकांना असं वाटतं की सुरेश धस पुढाकार का घेत आहेत? यावरून त्यांच्या पोटात दुखतं आहेत”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.