Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajya Sabha Election : शिंदे सेनेचा राज्यसभेचा उमेदवार ठरला; इंग्रजीत PHD, पाच...

Rajya Sabha Election : शिंदे सेनेचा राज्यसभेचा उमेदवार ठरला; इंग्रजीत PHD, पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या ज्योती वाघमारेंना संधी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

दहा राज्यांतील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता आज (गुरुवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) होणार आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपच्या वाट्याला चार आणि शिंदे सेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा आली आहे. यात महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर शिंदे सेनेकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवार ठरलेला नव्हता. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कोण? असा पेच निर्माण झाला होता. अखेर हा तिढा सुटला असून, शिंदे सेनेकडून प्रवक्त्या ज्योती वाघमारे अर्ज भरणार आहेत.

भाजपकडून (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अर्ज भरणार आहेत. यानंतर आता शिंदे सेनेकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिवसेनेकडे माजी खासदार राहुल शेवाळे, शायना एन सी, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ,संजय निरुपम यांची नावे चर्चेत होती. मात्र, या सर्व नावांना वगळून नवख्या ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेकडून दुसरा उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवार दिल्यास निवडणूक होऊ शकते. महायुतीकडे अधिकची मते असल्याने त्यांचाही उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु, उमेदवार न दिल्यास महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून जाऊ शकतो.

ज्योती वाघमारे कोण?

ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे. सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केले. मात्र, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले. वडिलांचा हाच सामाजिक वारसा ज्योती वाघमारे यांनी पुढे चालवला. त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी (PhD) प्राप्त केली असून, महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनासाठी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर प्रभुत्व आहे.

सामाजिक चळवळ ते राजकारणाचा अनुभव

अधिव्याख्याता म्हणून दहा वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव असलेल्या डॉ. वाघमारे यांनी आपल्या कार्याची सुरुवात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतून केली. काही काळ त्यांनी वृत्त निवेदिका म्हणूनही काम पाहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात व्याख्याने दिली आहेत. त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यातील वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्ती ओळखून त्यांची राज्य प्रवक्तेपदी आणि धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यांमध्ये त्यांनी केलेली भाषणे प्रचंड गाजली आहेत. त्यांची ओळख केवळ एक प्रवक्त्या इतकीच मर्यादित नाही, तर त्या राज्यघटना आणि आंबेडकरी विचारांच्या गाढ्या अभ्यासक आहेत. आगामी काळात संसदेत किंवा विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळाल्यास, त्यांच्या अभ्यासू मांडणीचा फायदा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : उपोषण स्थगित करण्याची आज विनंती करणार – ना. विखे...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असून आज...