नवी दिल्ली | New Delhi
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडून ‘संख्याबळ म्हणजेच पक्ष’ असा चुकीचा आणि बेकायदेशीर पायंडा पाडल्याचा म्हटले.
१० व्या अनुसूचीचा गैरवापर
यावेळी सिब्बल युक्तिवाद करताना म्हणाले की, काही आमदार (MLA) फुटून बाजूला झाले म्हणजे तो मूळ राजकीय पक्ष होत नाही. विधिमंडळातील संख्याबळ आणि मूळ राजकीय पक्ष या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अध्यक्षांनी आमदारांच्या संख्येवरून पक्ष ठरवणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे, असे सांगितले. तसेच शिवसेनेच्या २०१८ च्या अधिकृत घटनेनुसार सर्व अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत. उद्या पक्षात मतभेद झाले म्हणून पक्षप्रमुखांचे अधिकारच संपवून टाकले, तर पक्षाची शिस्त आणि संविधानाला काहीच अर्थ उरणार नाही, असेही सिब्बल यांनी म्हटले.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा
सिब्बल म्हणाले की, फुटीवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सुरुवातीला १६ आणि नंतर ३९ आमदार गेले. विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीलाच निपक्षपातीपणे कारवाई केली असती, तर आज महाराष्ट्राचे राजकीय चित्र वेगळे असते, असे म्हटले. तर सुनावणीदरम्यान न्यायालयाने “विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने हे प्रकरण आता कितपत सक्रिय राहिले आहे?” अशी टिप्पणी केली. त्यावर सिब्बल यांनी स्पष्ट केले की, हा प्रश्न केवळ एका पक्षापुरता किंवा सुभाष देसाई यांच्या याचिकेपुरता मर्यादित नसून, देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगितले.
अध्यक्षांनी १९९९ ची घटना गृहीत धरणे बेकायदेशीर
‘सुभाष देसाई’ खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१८ ची घटनाच विचारात घेणे बंधनकारक होते. दोन्ही गटांनी २०१८ च्या घटनेला मान्यता दिली होती. असे असताना अध्यक्षांनी परस्पर १९९९ ची घटना लागू करून तपासणी करण्याचे अधिकार कुठे मिळवले? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. तसेच ठाकरे गटाकडून अध्यक्षांच्या निवडीविरोधात अधिकृत ‘व्हिप’ जारी करण्यात आला होता. तरीही शिंदे गटाने (Shinde Group) त्याविरोधात मतदान केले. अध्यक्षांना आधीच काय निर्णय घ्यायचा आहे हे ठाऊक होते, त्यामुळेच त्यांनी गुंतागुंतीचा तर्क लावून निष्कर्ष काढला, असे म्हणत सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) निर्णयावर ताशेरे ओढले.
उद्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण होणार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी न्यायालयात बाजू मांडताना अनेक मोठे दावे आणि कायदेशीर युक्तिवाद केले. त्यानंतर आजचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, उद्या (बुधवारी) सिब्बल आपल्या युक्तिवादाचा उर्वरित भाग मांडून तो पूर्ण करणार आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर, २०१८ च्या पक्षाच्या घटनेवर आणि ‘१० व्या अनुसूची’च्या (अपात्रता कायदा) वापरावर जोरदार आक्षेप घेतले. विधिमंडळातील आमदारांचे संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे, असा ठाम दावा त्यांनी केला. उद्या सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाकडून आणि इतर संबंधित पक्षांकडून या दाव्यांना काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.




