मुंबई | Mumbai
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. त्यातच विधिमंडळाच्या अधिवेशनात मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडीओ राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर कोकाटे हे पुन्हा वादात सापडले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यामुळे कोकाटे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवारांनी त्यांना पुन्हा अभय दिल्याचे पाहायला मिळत आहे.
आज (मंगळवारी) मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात पक्षाचे मुख्य नेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी तुमच्यामुळे सरकारची (Goverment) बदनामी होत आहे. बोलताना भान ठेवायला हवे, असे म्हणत त्यांचे कान टोचले. त्यावर कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत यापुढे बोलतांना, वागताना काळजी घेईल, असे म्हटले. जवळपास दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निघून गेले.
यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय येताच अजित पवारांनी थेट डाव टाकला. मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादांना कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) मंत्र्यांवर कारवाई होणार, असे सांगितल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतल्यास अजित पवार विरोधकांच्या दबावासमोर झुकले असा संदेश जाऊ शकतो. तसेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांना वाचवत असताना अजित पवारांनी कोकाटे यांचा राजीनामा घेतल्यास पक्षात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याचे म्हणणे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कोकाटे यांचा राजीनामा होतो की नाही? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.





