मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जाणारे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
सचिन अहिर हे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जायचे. प्रत्येक कार्यक्रमात आणि दौऱ्यात ते आदित्य ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरताना दिसत. ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या पक्षांतराच्या लाटेत, अत्यंत कठीण काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाची वाट धरल्याचे या घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे.
कसा राहिला आहे सचिन अहिरांचा राजकीय प्रवास?
सचिन अहिर यांची मूळ ओळख ‘डॉन’ अरुण गवळी यांचे भाचे अशी आहे. दक्षिण मुंबईतील गिरणगाव भागात पूर्वी अनेक कापड गिरण्या (मिल्स) होत्या. या मिल्सच्या युनियनच्या माध्यमातून कामगारांचे नेतृत्व करत सचिन अहिर यांनी राजकारणात आपला पाया रोवला.अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
तीनवेळा आमदार आणि माजी मंत्री
सचिन अहिर यांनी मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९९, २००४ आणि २००९) विजय मिळवला होता. वरळीमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांची राज्याच्या गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी (Minister of State for Housing) वर्णी लागली होती. यानंतर प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर, २६ जुलै २०१९ रोजी त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अखंड शिवसेनेत प्रवेश केला होता. २०२० मध्ये त्यांची अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. तर २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची विधान परिषदेवर सदस्य (MLC) म्हणून नियुक्ती झाली होती.
एकाच दिवसात पक्षांतर आणि उमेदवारी अर्ज!
विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक लक्षात घेता शिंदे यांच्या शिवसेनेकडून अहिर यांना थेट उपसभापती पदाची संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर कोणतीही वेळ न घालवता सचिन अहिर यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि लगेचच उपसभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला.




