नवी दिल्ली | New Delhi
येत्या १२ डिसेंबरला म्हणजेच उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस असून, त्यानिमित्त काल (दि.१० डिसेंबर) रोजी रात्री शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह आदी दिग्गज नेत्यांनी स्नेहभोजनाच्या कर्यक्रमाला हजेरी लावली.
राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभी राहिल्याचे दिसून आले. परंतु, शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे नेते, खासदार पवारांच्या घरी दिसून आले. याआधी शरद पवार राज्यसभेचा कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांसाठी स्वतः स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. तसेच महाराष्ट्रातील एखाद्या खासदाराचा कार्यकाळ संपणार असेल तर त्याच्या स्नेहभोजनासाठीही शरद पवार कार्यक्रम आयोजित करतात. आता शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ हा जून महिन्यात संपत आहे. त्यामुळे शरद पवारांचे हे शेवटचे हिवाळी अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हे स्नेहभोजन आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एकाच गाडीतून शरद पवारांच्या निवासस्थानाहून बाहेर पडले. त्यानंतर दोघेही विमानतळावरून महाराष्ट्राकडे रवाना झाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (अजित पवार) खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार – अजित पवारांची २० मिनिटे चर्चा
काल शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजन झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये कौटुंबिक आणि राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडतात का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.





