Friday, July 24, 2026
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, "जात धर्म..."

Raj Thackeray : मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “जात धर्म…”

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आज (९ मार्च) रोजी २० वा वर्धापनदिन आहे. हा वर्धापनदिन छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी साजरा केला जाणार आहे. या वर्धापनदिन सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहकुटुंब रायगडावर दाखल झाले असून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केले आहे. मात्र, वर्धापनदिन सोहळ्यापूर्वी राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, राज ठाकरे पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनी नेमकं काय भाष्य करतात आणि कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला २० वर्ष झाली. २० वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील. २० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण २० वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं! मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या कधी यश मिळालं कधी नाही मिळालं पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येईल.

गेल्या २० वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !

अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या १० मार्च २०२६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील !

त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा.

तुमचं मनःपूर्वक स्वागत असेल.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...