Saturday, July 25, 2026
HomeराजकीयMaharashtra Politics : फडणवीस दिल्लीत गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार; बड्या नेत्याच्या...

Maharashtra Politics : फडणवीस दिल्लीत गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फेरबदलात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाचारण करून त्यांच्याकडे देशाचे ‘अर्थमंत्रीपद’ सोपवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राची धुरा कोणाकडे जाणार? याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला असून, यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आज (शनिवारी) सकाळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस जर केंद्रीय मंत्रिमंडळात गेले, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे सर्वात मजबूत दावेदार ठरू शकतात. तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते दिसतात. बावनकुळे हे सर्व पक्षांतील नेत्यांशी योग्य संवाद ठेवणारे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत” असे संजय राऊत यांनी म्हटले.

गिरीश महाजनांचा रेकॉर्ड खराब

पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्रीपदासाठी गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, त्यामुळे त्यांना हे पद मिळणारच नाही. जर फडणवीस केंद्रात गेले, तर १०० टक्के बावनकुळे यांच्याच नावाचा विचार होईल आणि स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावाची शिफारस करतील, असं माझं आकलन आहे”, असेही राऊत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत

या सर्व घडामोडींवर भाष्य करताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भवितव्यावरही थेट विधान केले. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांची इच्छा असली तरी हे शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी गोटात आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राज्याचा स्वाभिमान टिकवणाऱ्याला नेहमीच शुभेच्छा!

राऊत पुढे म्हणाले की, “मी तुम्हाला फक्त माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं आहे. त्यांच्या पक्षातील निर्णय घेणारे आम्ही नाही आहोत. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहील, राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि राज्याचा स्वाभिमान टिकवेल. अशी कोणीही व्यक्ती असेल, तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या