मुंबई | Mumbai
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक (Loksabha and Vidhansabha Election) एकत्र लढणाऱ्या महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधी मोठी फुट पडली आहे. मविआतील घटक पक्ष असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेने महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली पक्षाचे खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) माध्यमांशी बोलतांना केली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी तुटली आहे. त्यानंतर आता दुसरीकडे महायुतीत देखील धुसफूस निर्माण झाली असून शिंदेंची शिवसेना बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadnavis) यांना नागपुरातील एका कार्यक्रमावेळी मुलाखती दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलतांना सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आधी आमचे मित्र होते. आता राज ठाकरे आमचे मित्र आहेत. मात्र, उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे महापालिका निवडणुकीआधी नव्या युतीचे संकेत मिळाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज असल्याच्या चर्चेमुळे या वक्तव्यांना उधाण आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून झालेली गच्छंती आणि त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेली कमी महत्त्वाची खाती पाहता महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचे सांगितले जाते. तसेच ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात जवळीक वाढत असल्यामुळेही शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. कारण दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच याआधी देखील उद्धव ठाकरे यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरेंनी देखील अधिवेशनावेळी फडणवीस यांच्यासोबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर हस्तांदोलन केले होते. दोन्ही नेत्यांच्या या कृतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीत आणखी भर पडल्याचे सांगितले जाते.