रायगड | Raigad
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवालीत उपोषणाला बसले असून, आज (मंगळवार) त्यांच्या उपोषणाचा ११ वा दिवस आहे. जरांगे मागणी मान्य होईपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत मागण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. परंतु, अद्यापही जरांगे यांचे समाधान झालेले नाही.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील मराठा आरक्षणावर भाष्य केले असून, संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला सर्व शक्य त्या सवलती आणि आरक्षण देण्यास सरकार तयार असल्याचे म्हटले आहे. रायगडमधील पायाभूत सुविधांच्या कॉरिडॉरचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडले. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणावर (Hunger Strike) अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसला तरी, कायद्याच्या चौकटीत राहून तोडगा काढण्यासाठी सरकार (Government) सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
यावेळी ते म्हणाले की, “मराठा समाजाला आजपर्यंत जे काही दिले आहे, ते आमच्याच सरकारने दिले आहे. विधानात आणि न्यायालयाच्या चौकटीत बसणारे सर्व निर्णय सरकार घेईल. कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देणे योग्य नाही. मराठा समाजाला पूर्ण न्याय देण्याची भूमिका सरकारचीच आहे आणि चर्चेची दारे नेहमी उघडी आहेत, असे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले आहे.
आता शिष्टमंडळ भेटीसाठी जाणार नाही – विखे पाटील
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जे निर्णय घेता येणे शक्य होते, तेवढे निर्णय घेतले आहेत. तरीही जरांगे यांचे समाधान होत नसेल तर आमचा पर्याय नाही, असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीला जाणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली आहे.




