मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरे यांना भेटत आहेत. त्यामुळे या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या २० मिनिटांपासून चर्चा सुरू आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काही चर्चा होते का? याकडे भाजप आणि मनसे (BJP and MNS) कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट नियोजित नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर येत आहे. तर याआधी भाजपने स्पष्ट केले होते की राज ठाकरेंसोबतचे आमचे संबंध चांगले आहे. तसेच भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी (Vidhansabha Election) काही जागांवर राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहणे महत्वाचे असणार आहे.