Saturday, April 18, 2026
Homeमुख्य बातम्याSunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाषण; महिलांसाठी केली मोठी...

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाषण; महिलांसाठी केली मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र सरकारने जागतिक महिला (Women) दिनाचे औचित्य साधत राज्यातील महिला कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली. विधानपरिषदेत आपले पहिले भाषण करतांना नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी नोकरी करणाऱ्या महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करून’लवकर या, लवकर जा’ ही संकल्पना राबविण्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरात प्रवासाचा आणि गर्दीचा त्रास सहन करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

यावेळी पवार म्हणाल्या की, मुंबईसह (Mumbai) राज्यातील शासकीय कार्यालयांत कामाला असणाऱ्या महिलांना सकाळी कामावर येताना लोकल आणि बसमधील प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. हा ताण कमी करण्यासाठी सरकारने वेळापत्रकात बदल केला आहे. ज्या महिला कर्मचारी सकाळी ९.१५ वाजता कार्यालयात हजर होतील, त्यांना सायंकाळी निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास लवकर घरी जाण्याची मुभा असेल. यामुळे महिलांना सायंकाळच्या गर्दीपूर्वी घरी पोहोचता येईल, ज्यामुळे त्यांना कुटुंबासाठी अधिक वेळ देता येईल. ‘लवकर या लवकर जा’ या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ यादरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी येऊन कामकाज सुरु करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच ३० मिनिटांची सवलत देण्यात येईल. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी होणारी गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल,” असे त्यांनी म्हटले.

पुढे त्या म्हणल्या की, “महिलांच्या सुरक्षेसाठी (Women Safety) अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘शक्ती कायदा’ लवकरात लवकर संमत व्हावा, यासाठी शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत,” असे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले. तर भाषणाच्या शेवटी ग्रामीण संस्कृती आणि स्त्रियांच्या कष्टांचे प्रतीक असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ या ओळींचा उल्लेख करत त्यामध्ये स्त्रियांच्या सहनशीलतेची कष्टाची आणि सृजन शक्तीची ताकद दडलेली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

साखर कारखान्यांचा मुद्द्याकडे वेधले सभागृहाचे लक्ष

सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी साखर कारखान्यांच्या (Shugar Factory) आर्थिक अडचणींकडे सभागृहाचे लक्ष वेधले. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच इथेनॉल धोरणात सुधारणा करून कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आजची स्त्री जिद्दीने संकटांना सामोरी जाते

भाषण करतांना सुनेत्रा पवार यांनी आजची स्त्री अशाच जिद्दीने संकटांना सामोरी जात, स्वत:चा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता घडवणारा समाज घडवण्याचा आपल्या संकल्प अधिक दृढ करुया, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे दिसून आले.

१८० दिवसांची प्रसूती रजा

केंद्र शासनाच्या धर्तीवर महिलांना १८० दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे. गरज भासल्यास ०१ वर्षांपर्यंत देय अर्ध वेतन रजा कोणत्याही मेडिकल प्रमाणपत्राशिवाय मिळणार आहे. मातृत्व सन्मानासाठी या योजनेची अंमलबजवणी केली जाणार आहे.

१७ हजार २५४ अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाबाबत आणि पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राज्यातील १७ हजार २५४ अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असल्याचे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती दिली.

ताज्या बातम्या

विरोधकांनी महिलांचा अधिकार हिसकावला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
दिल्ली | देशातील महिला शक्तीचे उडान विरोधकांकडून थांबविण्यात आले असून आमचे अथक प्रयत्न करून सुद्धा महिला आरक्षणात बदल होऊ शकला नाही. विरोधकांनी महिलांचा अधिकार...