नागपूर | Nagpur
शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच आता आगामी काळात महापालिकांच्या निवडणुका येणार आहे. त्यामुळे सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. त्यातच पुढच्या काही दिवसात दसरा असल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दरम्यान राज्यात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शिंदे सेनेकडून उध्दव ठाकरेंना धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंचे २ आमदार वगळता बाकीचे सर्व संपर्कात आहेत. सोबतच अनेक माजी नगरसेवकही पक्षात येतील असा दावा शिंदेसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला असून दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही मुहूर्त काढणार आहोत. ठाकरेंचे २ आमदार सोडून बाकी सर्व आमच्या संपर्कात आहेत. जे उरले सुरले नगरसेवक आहेत, त्यातील ८० टक्के नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांचाही पक्षप्रवेश होईल. उबाठा संपलेली तुम्हाला दिसेल. दसरा मेळाव्यानंतर पक्षप्रवेश होतील. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आमच्याकडे जोरात तयारी सुरू आहे असं त्यांनी म्हटलं.
ठाकरे गटातील अनेक आमदार संजय राऊत यांच्या भुमिकेवर नाराज आहेत, असा दावा आमदार कृपाल तुमने यांनी केला आहे. दसरा हा दिवस शिवसेनेसाठी महत्वाचा दिवस असतो आणि याच दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या घोषणा झाल्या आहे. यावेळीही दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत आमदार कृपाल तुमाने यांनी दिले आहे.
निष्ठावंत शिवसैनिकांवर बोलणे म्हणजे बाळासाहेबांचा अवमान
दरम्यान, कृपाल तुमाने यांचा लोकसभेला आम्ही दारूण पराभव केला, ते अशी भाषा वापरतायेत. तुमानेंना इतके महत्त्व द्यायची गरज नाही. त्यांना नैराश्य आले आहे. ज्यांचा स्वत:चा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघाला आहे, ते दुसऱ्यांचे आमदार पक्षात घेण्याची भाषा करतात. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत तो शुद्ध निष्ठावंत लोकांचा पक्ष आहे. ज्यांना जायचे होते तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, सीबीआय, ईडी यांच्या धमक्यांना घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांवर बोलणे म्हणजे शिवसेनेचा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे. जे आता धक्का देण्याचे भाष्य करतात ते कधीकाळी शिवसेनेचे खासदार होते, आम्ही त्यांना निवडून आणले होते. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला. त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणले. ते आमदार फुटणार बोलतात. त्यांचे नशीब आधीच फुटले आहे ते बघावे असा टोला संजय राऊतांनी कृपाल तुमाने यांच्या दाव्यावर लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




