मुंबई | Mumbai
राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यरत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्याकडून नव्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना (Deputy Chief Minister’s Medical Aid Room)करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या मदतीसाठी नवी समांतर यंत्रणा कार्यान्वित करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २०१४ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली होती. या निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कक्षाचे काम प्रभावीपणे केले. त्याचा फायदा शिंदे यांना प्रतिमा संवर्धनासाठी झाला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत मंत्रालयात उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला होता. या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयात निर्धन रुग्णांना उपचार, राज्यभरात आरोग्य शिबिर भरवणे तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आदी सेवाभावी कामे केली जात होती.
मुख्यमंत्री (CM) झाल्यानंतर फडणवीस यांनी हा कक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला जोडला. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या ९ फेब्रुवारी रोजीच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार चिवटे यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे नेमके कामकाज कसे असेल याबाबत माहिती दिली.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या (State Government) महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मोफत रुग्णसेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे एकनाथ शिंदे मानतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत यासाठी या कक्षातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे चिवटे यांनी स्पष्ट केले.
समन्वयाची भूमिका
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसहाय्य वितरीत केले जाणार नाही. परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तसेच धर्मादाय रुग्णालय योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यासह केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा कसा देता येईल, त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार कसे करता येतील, यासाठी समन्वयाची भूमिका पार पाडली जाणार असल्याची माहिती चिवटे यांनी दिली.