मुंबई | Mumbai
शिवसेनेते (Shivsena) फुट पडल्यानंतर अनेक नेते माजी आमदार आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Shivsena) प्रवेश करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस ठाकरेंची शिवसेना कमकुवत होतांना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात (Kokan) लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे एकनिष्ठ असलेले कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Former MLA Rajan Salvi) येत्या १३ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे भाजपमध्ये (BJP) जाणार अशी चर्चा होती.
राजन साळवी भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले होते, भाजप नेत्यांशी त्यांची तशी चर्चा देखील झाली होती. मात्र, सध्या भाजपमध्ये राजन साळवी यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राजन साळवी भाजपमध्ये जात असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यांचे परतीचे दोर जवळपास कापले आहेत. त्यामुळे राजन साळवी सध्या ठाकरे गटात फारसे सक्रिय दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साळवी शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते.
दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माध्यमांशी बोलतांना साळवी यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नसल्याचे म्हटले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला आहे. त्याच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पक्षात आले आहे व येत आहे. त्यामुळे राजन साळवी यांना पक्षात घेतांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतील”, असे त्यांनी म्हटले आहे.