Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली, पण 'या'...

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली, पण ‘या’ राजकीय वाटाघाटी आताच करून ठेवल्या

पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी सगळंच सांगितलं

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे सेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी ठाकरे सेनेने कुठलीही चर्चा न उमेदवार दिल्यामुळे आपण उमेदवार देणार असे म्हटले होते. त्यामुळे मविआत समन्वयाचा अभाव दिसून आला होता. त्यानंतर आज (गुरुवारी) सपकाळ यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस पक्षाने ठाकरे गटासमोर प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मविआच्या (MVA) नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी एकजूट असल्याचा सूचक संदेशही दिला.

- Advertisement -

यावेळी सपकाळ म्हणाले की, “२०१९ ला भाजपची भूमिका, दंडेलशाही, सगळ्या संस्थानाचा गैरवापर या पार्श्वभूमीवर आम्ही एकत्र येऊन मविआ स्थापन केली. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी एकत्र आलो. आमची इच्छा होती उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत यावे. मात्र, उद्धवजींनी अंतरआत्म्याचा आवाज ऐकला. भाजपची भूमिका ही संविधान विरोधी भूमिका आहे. ⁠फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरोधातील भाजपची भूमिका आहे. यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. त्यांच्याविरोधातील आमचा संघर्ष पुढेही असाच सुरु राहणार असून, येणाऱ्या निवडणुकीमध्येही आम्ही एकत्र असणार आहोत”, असे त्यांनी म्हटले.

पुढे म्हणाले की, “बैठकीनंतर काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.⁠राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवले. तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, अशी सर्वांची भूमिका होती. मात्र, मी परत विधान परिषदेवर जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सोनिया गांधी यांनी जसे पंतप्रधान होणार नाही, अशी भूमिका घेतली. तशीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. यात ⁠कोणाचा अनादर नाही. ⁠त्यांनी घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून आम्ही मानतो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. त्यांनी आघाडीतील समन्वयाच्या भूमिकेसाठी पुढाकार घेतला” असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेसने नेमका कोणता प्रस्ताव ठेवला?

पत्रकार परिषदेआधी गांधी भवन येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसने (Congress) ठाकरे गटासमोर आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने एक प्रस्ताव ठेवला. “राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळायला हवी. त्या बदल्यात पुढील विधानपरिषदेच्या दोन जागा तुम्ही घ्या. नाही तर विधानपरिषदेच्या दोन जागा आम्हाला द्या आणि राज्यसभेची जागा तुमच्याकडे ठेवा”, असा प्रस्ताव काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसचे नेते त्यांच्या वरिष्ठ नेतृत्त्वाशी तर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करत आहेत.

काँग्रेसची तलवार झाली म्यान

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करताना सुरुवातील म्हटले होते की, “जर उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, मात्र ऐनवेळी ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. तसेच उमेदवार देण्याचे संकेतही दिले होते. परंतु, ठाकरे सेनेच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर काँग्रेसची तलवार म्यान झाल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्या