मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे (Murder Case) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मुंडे यांच्यावर टीका केली आहे. मात्र,ही टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी बोलतांना आमदार जानकर म्हणाले की, “आजपर्यंत स्त्री वेश्या असतात माहिती होतं पण ‘पुरुष वेश्याही असू शकतो हे पहिल्यांदाच पाहिले, असे म्हणत त्यांनी मुंडेंचा पुरुष वेश्या असा उल्लेख केला. मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागे असते, शुद्धीवर असते तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू असल्याचा आरोपही उत्तम जानकरांनी (MLA Uttam Jankar) केला.
तसेच सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी झाल्यानंतरच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलिस स्टेशनमध्ये मिळत आहे, असा खळबळजनक दावा देखील जानकर यांनी केला. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या चहूबाजूंनी टीका सुरु असून त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता आमदार उत्तम जानकर यांनी मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम (EVM) हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र,तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केले, कशी मते चोरली, हे मी पुराव्यानिशी सांगतो. स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत आहे, ते देशाला घातक आहे. सरकार ज्या पद्धतीने या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील महाभयंकर घातक आहे” असे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटले.