Monday, April 6, 2026
HomeराजकीयMaharashtra Politics : मुंबई वार्तापत्र - मराठी ऐक्यातून युतीची मुहूर्तमेढ?

Maharashtra Politics : मुंबई वार्तापत्र – मराठी ऐक्यातून युतीची मुहूर्तमेढ?

मुंबई | उद्धव ढगे-पाटील | Mumbai

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कितीही इच्छा असली तरीही मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत (Mumbai NMC Election) ठाकरे बंधूचे ऐक्य कायम राहील का? दोघांमध्ये महापालिकेचे जागावाटप सुरळीत होईल का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीचे अस्तित्व राहील का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जात आहेत.

- Advertisement -

दोन दशकांची भाऊबंदकी विसरून महाराष्ट्र, मराठी भाषा तसेच मराठी अस्मिता धर्माला जागून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू अखेर एकत्र आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या हयातीत जे जमले नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी करून दाखवले, निमित्त ठरले ते शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा करण्याचा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना फडणवीस सरकारला हिंदी सक्तीच्या निर्णयाची दुर्बुद्धी सुचली आणि एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधूंना संधी दिली.

विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) दारुण पराभवामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मरगळ आली होती. शिवसेना ठाकरे पक्षाला तर गळती लागली होती, मनसेतही प्रचंड अस्वस्थता होती. मुंबई महापालिका निवडणुकीत आपले काय होणार? याची चिंता दोन्ही ठाकरे बंधूना लागली होती. त्यामुळे त्यांच्या मनोमीलनाची चर्चा सुरू होती. ही चर्चा राजकीय ऐक्याची होती मात्र, ती पुढे सरकत नव्हती, कारण दोघांना एकमेकांविषयी संशय! उद्धव ठाकरे यांना राज यांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली सलगी मान्य नाही; तर राज यांना उद्धव ठाकरेंचा परसोडपणा, वेभरवत्ता अमान्य आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय जारी केला आणि ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी आयती संधी मिळाली.

सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात (Hindi Language) राज ठाकरे यांनी पहिल्यांदा मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली. दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्यावर दोन वेगवेगळी आंदोलने योग्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला. तसे इशारे ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषदेतून दिले. आंदोलनाची हवा तापू लागल्याचे पाहून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आणि आंदोलनासाठी राज-उद्धव एकत्र येणार नाहीत, याची काळजी घेतली. परंतु, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे म्हणून दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य मराठी माणसाचा दबाव होता. शिवाय भाजपच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येणे अपरिहार्य वाटत होते. त्यामुळेच हिंदी सक्तीवरून सरकारने माघार घेतल्याचे जाहीर करताच विजयाचा जल्लोष करण्याचा निर्णय झाला.

त्यानु‌सार वरळीच्या (Warli) जल्लोषात उद्धव-राज ठाकरे एकव आले. व्यासपीठावर दोघांचे एकत्र आगमन झाले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. इतकेच नव्हे तर या दोघांचे राजकीय वारसदार असलेल्या आदित्य आणि अमित ठाकरे या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करीत राजकारणातील ठाकरे ब्रँड अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दिले. तसे पाहिले तर राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आपली वेगळी चूल मांडली असली तरीही त्यांनी ‘मातोश्री’ किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कौटुंबिक संबंध जोपासले होते. त्यामुळे कुटुंबाच्या कार्यक्रमात दोघे अनेकदा एकत्र दिसले. तसेच २०११ मध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नावर जेव्हा मोर्चा निघाला तेव्हाही दोघे एकत्र होते. मात्र, मधल्या काळात उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राज ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम ठेवली होती.

लोकसभा निवडणुकीत कधी भाजप (BJP) विरोध तर कधी भाजप समर्थन करीत राज यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना गोंधळात टाकले होते. त्यामुळे राज यांचे राजकीय नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या मुद्‌द्यावर का होईना, पण राज आणि उद्धव यांचे एकत्र येणे महत्वाचे ठरते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आता एकत्र राहण्यासाठी एकत्र आल्याचे सांगत आगामी मुंबई महापालिका निवडणूक राज ठाकरे यांना सोबत घेऊन लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी हा मेळावा मराठीचा आहे, यात कोणताही राजकीय अजेंडा नाही, असे सांगून आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची कितीही इच्छा असली तरीही मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत ठाकरे बंधूचे राजकीय ऐक्य कायम राहील का? ते कायम राहिले तर दोघांमध्ये महापालिकेचे जागावाटप सुरळीत होईल काय? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीचे अस्तित्व राहील काय? ठाकरे आणि मनसेच्या युतीचा फटका केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार की, भाजपही गोत्यात येणार? असे प्रश्न यानिमित्त चर्चिले जात आहेत,

महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे ठरले तर शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीत जागावाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे. कारण दोन्ही पक्षांची ताकद मुंबई महानगरातील मराठी पट्ट्यात आहे. याच पट्टयात मुंबईच्या गेल्या दोन निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर मात केली आहे. २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने दादर-माहीममधून आपले उमेदवार निवडून आणले होते. मात्र, २०१७च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी या पराभवाची परतफेड केली होती, त्यामुळे मुंबईतील, विशेषतः ज्या विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे आमदार आहेत, तेथील जागावाटप दोघांच्या संबमाची कसोटी पाहणारे ठरणार आहे. शिवाय जागावाटपाचा निकष नेमका काय? हा मुद्दाही महत्वाचा असणार आहे. अर्थात मुंबई महापालिकेची प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरच राजकीय पक्षात जागावाटपाची चर्चा सुरू होणार आहे.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी झाली. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रबादीत फूट पडलेली नव्हती, आघाडीचे सरकार २०२२ मध्ये कोसळल्यानंतर आणि शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांत उभी फूट पडली. त्यानंतरही आघाडी एकत्र राहिली, या आघाडीने भाजप महायुतीच्या विरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. आघाडीला लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती विधानसभेला करता आली नाही. आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांना विधानसभेला यश मिळाले असते तर कदाचित ठाकरे बंधूच्या ऐक्याची आज जशी चर्चा आहे; तशी ती झाली नसती. अर्थात राजकारणात जर तरला अर्थ नसती, राजकीय परिस्थितीचा अंदाज पाहून राजकीय नेत्यांना निर्णय घ्यावा लागतो. आज उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळे ते मनसेसोबत जाण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत. ठाकरे यांच्या पक्षासाठी मुबई महापालिके ची निवडणूक महत्वाची असल्याने हा पक्ष राज यांच्यासोबत जाण्यास उत्सुक आहे. परंतु, त्याला राज ठाकरे तयार आहेत की नाही? ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

महाविकास आघाडी म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत साशंकता व्यक्त होत असताना मुंबई महापालिकेसाठी राज आणि उद्धव एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धब ठाकरे यांच्यासोबत जाण्याची शक्यता नाही. कारण या वर्षाच्या अखेरीस होऊ घातलेली बिहार विधानसभेची निवडणूक आणि मुंबईतील अमराठी तसेच मुस्लिम मतदार गमवायची भीती! राज ठाकरे यांचा परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय विरोध हा काँग्रेससाठी अडचणीचा आहे. काँग्रेसला मुंबईत जी काही थोडाफार जनाधार आहे तो अमराठी आणि त्यातल्या त्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय मतदारांचा! याशिवाय काही मुस्लिम आणि मराठी मतदार काँग्रेसला मानणारे आहेत. त्यामुळे काँग्रेसला मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही.

आघाडीचा दुसरा घटक पक्ष म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस. या पक्षाचे स्थापनेपासून मुंबईत संघटन नाही. त्यामुळे शरद पवार यांना मुंबईत आपला प्रभाव पाडता आला नाही. एकत्र असतानासुद्धा हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक या पक्षाला निवडून आणता आले आहेत. आता तर पक्षाची दोन शकले झाली आहेत. त्यामुळे शरद पवारांना मुंबईत नाईलाजाने काँग्रेससोबत किंवा उद्धव ठाकरे, यांच्यासोबत जावे लागेल, स्वबळावर निवडणूक लढवायची म्हटली तर राष्ट्रवादीला उमेदवारांची वानवा भासू शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचे विसर्जन जवळपास अटळ आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा परिणाम आघाडीप्रमाणे एकनाथ शिंदे आणि भाजपवर होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांना त्यांनी आपल्याकडे खेचले आहे.

मुबई महापालिका निवडणूक भाजपशी युती करून लढवायची, भाजपला मुंबईतील आपली ताकद आणि उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे, अशी शिंदे यांची रणनीती आहे. मात्र, ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदे यांना आपली रणनीती बदलावी लागू शकते. कारण ठाकरेंच्या मनोमीलनामुळे शिंदेंनी जमवलेले अनेक माजी नगरसेवक घरवापसी करू शकतात. त्याचा फटका शिंदे यांना बसू शकतो. राज-उद्धव एकत्र लढले तर शिंदेंच्या शिवसेनेचा (Shinde Shivsena) मतदार त्यांच्यापासून दुरावू शकतो. अशा वेळी ठाकरेंचे एकत्र येणे शिंदेंसाठी राजकीय नुकसानीचे ठरू शकते. भाजपला मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची आहे, ठाकरे बंधू स्वतंत्र लढतील, असे गृहीत धरून भाजप नेते शिंदेंना स्वबळावर लढायला भाग पाडणार होते. मुंबईतील मराठी मतदारांचे त्रिभाजन करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची भाजपची रणनीती होती. मात्र, ठाकरे एकत्र लढला तर भाजपलाही आपली निवडणूक भूमिका बदलावी लागेल. एकूणच ठाकरे बंधूंच्या निर्णयावर अन्य राजकीय पक्षांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपली दिशा ठरवावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...