पुणे | Pune
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीतून पुणे शिक्षक मतदारसंघाची (Pune Teachers Constituency) उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांची जोरदार धडपड सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे (शिंदे गट) इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची हुबळी येथे भेट घेतल्याने या निवडणुकीत (Election) मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
दिग्गजांची चिवटेंसाठी ताकद
कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि के. एल. ई. शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे तसेच कर्नाटकातील भाजप नेते माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मध्यस्थीने मंगेश चिवटे यांनी हुबळी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. के. एल. ई. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शाह यांचे स्वागत करताना चिवटे यांनी शिक्षक आमदारकीसाठी राजकीय फिल्डिंग लावल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर कोरे (Prabhakar Kore) यांनीही चिवटेंच्या उमेदवारीसाठी शब्द टाकला असल्याचे समजते. या राजकीय घडामोडींनंतर चिवटे यांना पुढील आठवड्यात दिल्लीत (Delhi) निमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महायुतीत जागेवरून रस्सीखेच
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतून (Mahayuti) अनेक मातब्बर इच्छुक रिंगणात आहेत. यात शिवसेने (शिंदे गट) कडून मंगेश चिवटे, कौस्तुभ गावडे आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह आदींचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे भाजपचे पारंपरिक मतदारसंघ असल्याचा दावा केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते हसन मुश्रीफ यांनी भैय्यासाहेब माने यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून शिक्षक मतदारसंघ भाजपने घ्यावा, अशी राजकीय गणिते मांडली होती.
परस्पर जागावाटप नको – क्षीरसागर
मुश्रीफ आणि भाजप नेत्यांच्या परस्पर वक्तव्यावर शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महायुतीतील जागावाटपाचा निर्णय कोणत्याही स्थानिक नेत्यांनी परस्पर न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हेच शीर्षस्थ नेते घेतील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान चिवटे यांनी अमित शाह यांची थेट भेट घेतल्याने पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या पदरात पडणार की भाजप आपला पारंपरिक दावा कायम ठेवणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




