मुंबई | Mumbai
कोकणातील ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर कोकणातील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे पक्षात नाराज असून ते उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडणार असल्याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’वरही त्यांनी टीका केली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”आमदार भास्कर जाधव यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. कोकणामध्ये भास्कर जाधव हे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे, त्यांची माझी चर्चा झाली, बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत. निरोप थोडा उशिरा गेला, अनाचक मीटिंग ठरली. मी त्यांना सुचवलं की ऑनलाईन अटेंड करा. मातोश्री परिसरामध्ये जामर असल्यामुळे वाय-फायचा प्रोब्लेम आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर चर्चा करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी, ते रुसायला आणि फुगायला एकनाथ शिंदे आहेत का? गावी जाऊन बसायला. आमचा सर्व नेत्यांशी संबंध आहे. शिवसेनेच्या सगळ्या एकत्र नेत्यांसह कोकणात जायचं ठरवले आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
तसेच यावेळी राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या (Eknath Shinde Shivsena) ‘ऑपरेशन टायगर’वरही टीका केली. ते म्हणाले की,”कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल. दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील, असे म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. तसेच आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही, असेही त्यांनी म्हटले.
तर राजन साळवी यांच्यावर टीका करतांना राऊत म्हणाले की,”राजन साळवी आमच्या पक्षाचे जुने, कार्यकर्ते होते. त्यांना आमदार, उपनेते अशी पक्षाने सगळी महत्त्वाची पदे दिली. सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकळ्या फुटतात का, सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते. निवडणूक (Election) हरून देखील राहिले असते. तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकुटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा”, असा इशाराही त्यांनी दिला.