मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची आज (गुरुवारी) एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईतील (Mumbai) वरळी येथील डोममध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा ठराव मांडला. यानंतर त्यांची एकमताने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (NCP National President) बिनविरोध निवड करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांनी खंबीरपणे सांभाळली असून, ज्येष्ठ नेत्यांच्या विनंतीवरून आता त्यांच्याकडे अधिकृतपणे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.आज कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली आहे.
दरम्यान, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. तसेच अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार स्वतः लढवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आजच्या बैठकीस पक्षाचे सर्व खासदार, आमदार आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार होते. या निवडीमुळे आजपासून राष्ट्रवादीत अधिकृतपणे ‘सुनेत्रा’ पर्व सुरु झाले आहे.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यामुळे राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती, सामान्य कुटुंबातून ते आले होते. २०२३ मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. त्यांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष केले होते. माझ्यावर एवढा मोठा विश्वास त्यांनी टाकला होता. पक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आम्ही काम केले. आपला पक्ष आपण कशा प्रकारे पुढे घेऊन जाणार आहोत हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकरे आणि भुजबळ, मुश्रीफ यांच्यासह सर्वांची जबाबदारी होती. ३५ वर्ष अजित पवारांचा मित्र म्हणून आज घोषणा करत आहे की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले जावे, असा प्रस्ताव पटेल यांनी मांडला. त्यानंतर, सर्वांनी हात उंचावत सहमती दर्शवली. तसेच, मी घोषणा करतो की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे, असे पटेल यांनी सांगितले.





