मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली.
मुख्यमंत्री (CM) झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर आता दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,”देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीत भाजपच्या (BJP) कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदाराची (MLA) मनसेला (MNS) ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ६ जागांवरील नियुक्ती विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आली होती. तर अजूनही उर्वरीत ६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
तसेच मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका (NMC Election) यंदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांच्या महापालिकांचाही समावेश आहे. या निवडणुकांमध्ये मनसेसोबत असेल तर महायुतीची (Mahayuti) ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे विरोधात जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वत: राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांना मागील काही निवडणुकांत सातत्याने अपयश आले असले तरी आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हीच बाब लक्षात घेत राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे बोलले जात आहे.