मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. अजूनही उद्धव ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी असून, या भेटीत जवळपास दोन्ही भावांत दीड तासाहून अधिक वेळ चर्चा सुरु आहे. त्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी येत्या २ ऑक्टोबरला म्हणजेच दसरा मेळाव्याच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
गणेशोत्सवात उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या घरी भेटी दिली होती. यावेळी त्यांनी राज यांच्या घरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज (बुधवारी) पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार अनिल परब हे देखील उपस्थित होते. तर राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे उपस्थित आहेत. गेल्या दीड तासांपासून या दोन्ही बंधूंमध्ये बैठक चालू आहे. त्यानंतर या बैठकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन्ही बंधूंचे युती करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) राज ठाकरेंसोबत युती करण्यास विरोध झाल्यास उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असले तरी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती घटस्थापनेच्या मुहूर्तावर होणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.





