Saturday, April 25, 2026
Homeनगरमाझ्या निधनानंतर पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत; सौंदाळाचे सरपंच शरद आरगडे...

माझ्या निधनानंतर पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत; सौंदाळाचे सरपंच शरद आरगडे यांचे इच्छापत्र

नेवासा (तालुका प्रतिनिधी)

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद बाबुराव आरगडे यांनी समाजातील अनिष्ट रूढींविरोधात ठाम भूमिका घेत, स्वतःचे इच्छापत्र तयार केले आहे. त्यांनी केवळ जिवंतपणी स्वतःचा दहावा घालून समाजाचे लक्ष वेधले नाही, तर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीर प्रतिज्ञापत्र तयार करून, विधवा स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीवर प्रहार केला आहे.

- Advertisement -

या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत. तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये. श्रीमती प्रियंका शरद आरगडे या माझ्या पत्नी असून, समाजात प्रचलित असलेल्या विधवा प्रथा, जसे की कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे, पांढरे वस्त्र परिधान करण्याची सक्ती तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे या अत्यंत अमानवीय असून स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या आहेत. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीवर कोणतीही अशी प्रथा लादली जाऊ नये. तिला विधवा स्त्रीप्रमाणेच कुंकू-टिकली लावणे, बांगड्या व दागिने परिधान करणे, कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करणे आणि सर्व सण-समारंभ, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी किंवा समाजाने तिला यापासून रोखू नये, तिच्याशी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा अपमानास्पद वागणूक दिली जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

श्री. आरगडे यांनी त्यांच्या इच्छापत्रात मृत्यूनंतरच्या धार्मिक विधींविषयीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दहावा, तेरावा किंवा श्राद्ध यांसारख्या विधींवर अनावश्यक खर्च केला जातो. माझा या रूढींवर विश्वास नाही. मृत्यूनंतर आत्म्याच्या शांतीसाठी विधी नव्हे, तर जिवंतपणी केलेली चांगली कर्मे महत्त्वाची असतात, असे त्यांनी नमूद केले आहे. या प्रतिज्ञापत्रावर सचिन अशोक आरगडे व गणेश अरुण आरगडे यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे, हे इच्छापत्र त्यांनी जाहीर कार्यक्रमात ध्वनीक्षेपकावर स्वतः वाचून दाखवले, ज्यामुळे समाजात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; CM फडणवीसांनी घेतले...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्या पत्नी आदिती ढिकले (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या...