मुबंई | Mumbai
पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या ९ जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर निकाल १२ मे रोजीच सायंकाळी जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना २३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर,रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके, रमेश कराड (भाजप) यांचा समावेश आहे.
दरम्यान, विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा जिंकू शकते. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मते असल्याने आणि महायुतीने अधिक उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळू शकते.
डॉ. प्रज्ञा सातव यांच्या जागेवरही होणार पोटनिवडणूक
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यांच्या आमदारकीची मुदत २७ जुलै २०३० पर्यंत आहे. त्यामुळे या रिक्त जागेवरही केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
- निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)
- उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)
- मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)
- मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
- मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)




