मुंबई । Mumbai
राज्यात सध्या हवामानाचा एक अत्यंत अनोखा आणि थक्क करणारा खेळ पाहायला मिळत आहे. एकीकडे रखरखत्या उन्हाने संपूर्ण विदर्भ होरपळून निघत असताना, दुसरीकडे मात्र वरुणराजाने मान्सूनपूर्व सरींची उधळण करत मुंबई आणि पुणेकरांना तीव्र उकाड्यापासून मोठा दिलासा दिला आहे. निसर्गाच्या या दुहेरी रूपामुळे कुठे आनंदाचे वातावरण आहे, तर कुठे नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
राज्याची राजधानी मुंबईत सकाळपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती, तर काही भागांत कोसळलेल्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला. दुसरीकडे, सांस्कृतिक राजधानी पुण्यात मात्र दुपारनंतर हवामानाने अचानक कूस बदलली. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पुण्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमशान घातले. हवामान खात्याने पुणे शहरासाठी आज ‘येलो अलर्ट’ जारी केला होता, जो तंतोतंत खरा ठरला. अवघ्या काही तासांच्या या पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्ते जलमय केले. पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुण्यातील भोर तालुक्यात या पावसाने दमदार हजेरी लावली. तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे भोर शहराला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचले होते. या पुलाला एखाद्या तळ्याचे स्वरूप आल्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून कसरत करत वाहने चालवावी लागली. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे आणि पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे पहिल्याच पावसाने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले. यामुळे स्थानिक प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याउलट, शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणले आहे. या परिसरातील उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला असून, हा पाऊस आगामी खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी अत्यंत पोषक ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हवामानाचे हे सुखावह चित्र पुणे आणि मुंबईपुरतेच मर्यादित असून, विदर्भाची स्थिती मात्र चिंताजनक आहे. नागपूरचे हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान प्रचंड वाढले आहे. अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा (हिटव्हेव) ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात पुढील ५ ते ६ दिवस तापमान सामान्यपेक्षा अधिक म्हणजेच ४५ ते ४७ अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी तापमानात घट होऊन नागरिकांना सध्यातरी कोणताही दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत.



