Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather : आज राज्यात कुठे पाऊस पडणार? काय सांगतो हवामान खात्याचा...

Maharashtra Weather : आज राज्यात कुठे पाऊस पडणार? काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज, जाणून घ्या

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र सध्या कमालीच्या हवामान बदलाचा सामना करत असून, राज्यात एकाच वेळी हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला वरुणराजाच्या आगमनाची चिन्हे असल्याने काही जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला विदर्भातील जनतेला ‘सूर्यकोपाचा’ तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. निसर्गाच्या या दोन वेगवेगळ्या छटांमुळे नागरिक मात्र चक्रावून गेले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने बेजार झालेल्या पुणेकरांसाठी आज अखेर दिलासादायक बातमी आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज पुण्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत थेट उन्हाचे चटके जरी थोडे कमी झाले असले, तरी हवेतील आर्द्रतेचे (Humidity) प्रमाण वाढल्याने नागरिक घामाने पुरते त्रस्त झाले होते. आज होणाऱ्या या संभाव्य पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होईल आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाने केवळ पुणेच नव्हे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे:

मध्य महाराष्ट्रात पावसाचे वातावरण असताना, विदर्भाची स्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे. विदर्भात रविवारीही उन्हाची तीव्र लाट कायम होती आणि आज (सोमवारी) ती अधिक भयावह होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे. दुपारच्या वेळी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच उष्माघातापासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

विदर्भातील इतर जिल्ह्यांची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. हवामान विभागाने अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) दिला आहे. या भागातही नागरिकांना सूर्यदेवाच्या तीव्र कोपाचा सामना करावा लागणार आहे. हवामानातील या अनपेक्षित आणि तीव्र बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, उष्णतेच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे, सुती कपडे वापरावे आणि पावसाच्या भागात राहणाऱ्यांनी विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...