संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
वीजबिलाच्या थकबाकीमुळे मीटर कट केल्याच्या रागातून महावितरणच्या सहायक अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना संगमनेर शहरातील रंगारगल्ली परिसरात शनिवारी (दि.15) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. राजेंद्र तुळशीराम शिंदे (वय 47), सहायक अभियंता, महावितरण शाखा-संगमनेर शहर 1) हे आपल्या सहकार्यांसह थकीत वीजबिलाबाबत शहरात फिरत होते. शहरातील रंगार गल्ली येथे राहणारे स्व. सोमनाथ सुतार यांच्या नावावरील असणार्या मीटरपैकी एक मीटर यापूर्वीच बंद केले असून दुसर्या मीटरचा दुकान व घरासाठी वापर केला जात होता. त्याची 19 हजार 900 रुपयांची थकबाकी असल्याने ती भरण्याबाबत राजेंद्र सोमनाथ सुतार यांना एक महिन्यापूर्वी महावितरण कंपनीने नोटीस दिली होती.
परंतू, त्यांनी सदरची नोटीस न स्वीकारल्याने त्यांना त्यांच्या व्हाट्सअॅपवर नोटीस पाठविली होती. तरी देखील त्यांनी थकबाकी न भरल्याने कंपनीने सदर जागेत वापर होत असलेले मीटर कट करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सहायक अभियंता राजेंद्र शिंदे हे आपले सहकारी सहायक अभियंता चेतन पकळे, वरिष्ठ तंत्रज्ञ मणीलाल गावित, काशिनाथ शिंदे, कंत्राटी कामगार किरण पुणेकर यांच्यासह सुतार यांच्याकडे गेले. या कर्मचार्यांनी त्यांचे मीटर कट केले.
यामुळे संतप्त झालेल्या राजेंद्र सुतार याने हातात काठी घेवून अभियंता राजेंद्र शिंदे यांना शिवीगाळ केली. शिंदे हे दिव्यांग असल्याचे माहीत असतानाही सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान करुन धमकी दिली. तसेच सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. याबाबत राजेंद्र शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र सोमनाथ सुतार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.