नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्रात आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असलो तरी काही ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून मैत्रीपूर्ण निवडणुका होतील, असे सूतोवाच आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आज भारतीय जनता पक्षाच्या संंघटन पर्वानिमित्त लंंडन पॅलेस येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला. त्यानंंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, प्रवक्ते प्रदीप पेशकर, गोविंद बोरसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे पुढे म्हणाले की, 7 जिल्ह्यांच्या पदाधिकार्यांचा संंवाद मेळावा आज नाशिकमध्ये झाला. राज्यात 1 कोटी 51 लाख प्राथमिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. 1 कोटी 14 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी झाली आहे. 3 लाख सक्रिय सभासद पक्ष पदाधिकारी होणार आहेत. ते जनता व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील.
महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणुका महायुतीत एकत्र लढणार आहे. मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे चित्र दिसत आहे. ते पुढे म्हणाले, विकसित महाराष्ट्र जाहीरनामा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
राज्य सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाही. नवीन योजना निश्चित आणणार आहे. 47 प्रकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे. भारतीय जनता पक्ष कमजोर असलेल्या ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पक्षप्रवेश देत आहे. मात्र जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता आम्ही घेणार आहोत.
नाशिकच्या पालकमंत्री पदाबद्दल ते म्हणाले की, जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अनुभव बघता एकत्रित निर्णय दहा, बारा दिवसांत बसून आम्ही घेऊ. नाशिकला भाजपला काही काळात मंत्रीपद देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आजच्या मेळाव्यात अनेकांनी पक्ष प्रवेश केला. त्यात मनसेनेचे पराग शिंत्रे, माजी नगरसेविका रत्नमाला राणे, उषा बेंडकोळी यांचाही समवेश होता. 63 लोकनियुक्त सरपंचांनी प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. तसेच मनसेना प्रदेश उपाध्यक्ष पराग श्रीकांत शिंत्रे, मनोजकुमार जोशी, निखिल सरपोतदार, रोहन जगताप, अॅॅड. सागर कडभाने, प्रतीक राजपूत, रोहित कुलकर्णी, किरण मोरे, मंदार पिंगळे, चेतन सोनवणे यांनी प्रवेश केला.