अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली असून नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी 50 लाख रूपयांचे पुरस्कार मिळाले आहेत. या अभियानात जिल्हा परिषदेने सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळवला आहे. राज्य शासनाच्या वतीने 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील 27 हजार 895 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.
अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक, दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द व दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी 50 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. याशिवाय विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती अहिल्यानगर व राहाता, तर जिल्हास्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती संगमनेर यांना प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन नोडल अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली ग्रामीण भागात उत्कृष्ट कामकाज करण्यात आले. तसेच 2025-26 मधील क्षेत्रीय पाहणी व मूल्यांकन विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली झाल्यामुळे राज्याच्या व विभागाच्या यादीत जिल्ह्याला ही मोठी संधी मिळाली आहे.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी बक्षीसाच्या रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम हरित क्षेत्र वाढवण्यासाठी व उर्वरित 50 टक्के रक्कम पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी खर्च करावयाची आहे. या ग्रामपंचायतींनी भूमी, वायू, अग्नी, जल व आकाश या घटकांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. पुढील माझी वसुंधरा अभियान 6.0 (2025-26) मध्येही पुरस्कार जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी स्पष्ट केले आहे. हे यश मिळवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नोडल अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा समन्वयक रवींद्र ठाणगे यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर व सरपंचांचे मोठे योगदान लाभले आहे.





