Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन ट्रक पलटी; दोन जण जागीच ठार; दोन गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन ट्रक पलटी; दोन जण जागीच ठार; दोन गंभीर जखमी

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज संध्याकाळी एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका ट्रकने समोरील दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात तीनही ट्रक महामार्गावरच पलटी झाले. या दुर्घटनेत एका ट्रकचा चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज दिनांक १५ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५:०५ वाजताच्या सुमारास एक्सप्रेसवेवरील मुंबई वाहिनीवर किमी ३८.१०० जवळ घडला. या अपघातात रंगाचे डब्बे आणि पावडर रस्त्यावर पसरली पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक KA.56-2199) वरील चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या ट्रकने त्याच्या समोर चालणाऱ्या ट्रक (क्रमांक RJ-19-GG-4175) आणि कंटेनर ट्रक (क्रमांक MH.04-GR-2874) यांना पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, हे तिन्ही ट्रक महामार्गावरच पलटी झाले.

अपघातग्रस्त वाहनांमध्ये रंगाचे डब्बे आणि केमिकल पावडरच्या बॅगा भरलेल्या होत्या. ट्रक पलटी झाल्यामुळे हा सर्व माल रस्त्यावर सांडला आणि रंगाचा थर महामार्गावर पसरल्याने मुंबईकडे जाणाऱ्या चारही लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या भीषण अपघातात धडक देणाऱ्या पहिल्या ट्रकचा (KA.56-2199) चालक आणि क्लिनर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. तसेच, दुसऱ्या ट्रकचा चालक वीर बळराम (रा. राजस्थान) आणि कंटेनर ट्रकचा चालक जिशान अली (वय ३१, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस आणि खोपोली पोलीस स्टेशनचे पथक अवघ्या १० मिनिटांत म्हणजे संध्याकाळी ५:२० वाजता घटनास्थळी हजर झाले. खालापूर विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, खोपोलीचे पोलीस निरीक्षक श्री. हिरे, आणि बोरघाट महामार्ग पोलिसांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तातडीने मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. आयआरबी कंपनीची पेट्रोलिंग टीम, ‘देवदूत’ यंत्रणा आणि खोपोलीतील सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.


जखमी चालकांना तातडीने उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मयत चालक व क्लिनर यांचे मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी खोपोली पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

अपघातानंतर महामार्गावर पडलेला माल आणि अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम रात्री ७:०० वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. रंगाचा माल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक संथ गतीने सुरू असून, पोलीस प्रशासनाकडून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

Sunetra Pawar: वर्धापन दिन साजरा करताना मनात वेगळीच…; राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी पाहिल्या. मोठ्या पक्षांमध्ये मतभेद झाले, दुफळी माजली, पक्षाचे दोन भागही झाले. शरद पवार...