मुंबई | प्रतिनिधी Mumbai
देशातील जनतेला सरकारच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीबाबत राग आहे. तो राग देशपातळीवरील आंदोलनांच्या माध्यमातून व्यक्त होतो आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत हा अख्खा देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पुढच्या साधारण दोन-पाच महिन्यांत देशात मोठी गडबड होईल. असा एक कालखंड येईल की ज्या कालावधीत देशाला पंतप्रधानच नसेल, असा खळबळजनक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला. तसेच देशातील निवडणुका ईव्हीएमवर नव्हे तर मतपत्रिकेवर घेण्याच्या मागण्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केली.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित ‘डान्स ऑफ डेमोक्रसी; या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित वार्तालापात बोलताना राज ठाकरे यांनी आगामी काळात देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे भाकीत वर्तवले.
पुढच्या काळात खूप गोष्टी बाहेर येणार आहेत, हे आता थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका करत जाणार. नीटचे आंदोलन, निवडणूक आयोगाचे आंदोलन ही व्यासपीठं आहेत. नीटच्या आंदोलनात काही सर्वच विद्यार्थी नव्हते. पण प्रत्येकाला सरकार विरोधात राग आहे, तो या व्यासपीठांच्या माध्यमातून व्यक्त झाला, असे राज ठाकरे म्हणाले.
भाजप पुरस्कृत चित्रपटच का बघायचे?
आपण आता घेतलेली भूमिका ही चुकीचे पायंडे पाडतेय का, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवावे. कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. खरी लोकशाही ही अमेरिकेत आहे, आपल्याकडे नाही. ऑस्करच्या व्यासपीठावर येऊन तेथील कलाकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरोधात बोलतात. पण त्यांच्या चित्रपटांना जाऊ नये, असे कोणतेही फतवे निघत नाहीत. आपण प्रत्येकवेळी भाजपने पुरस्कृत केलेले चित्रपटच बघायचे का, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला.
निवडणुकीत पारदर्शकता पाहिजे
मी ईव्हीएम नको ही मागणी २०१८ सालापासून करत आलो आहे. मतदान पत्रिकेवर कळते की मी हव्या त्याच उमेदवाराला मतदान केले. आपल्या आजूबाजूचे देश पाकिस्तान,श्रीलंका, बांग्लादेश इथे मतपत्रिकाच वापरली जाते. आफ्रिकेतील दोन-चार देश वगळता इतर कुठेही ईव्हीएमवर मतदान होत नाही. पुढारलेले देशही ईव्हीएम वापरत नाहीत. मग भारतातच ईव्हीएम कशासाठी हव्यात. मतमोजणी लवकर होते याचे कारण देतात. पण मतपत्रिका मोजायला जर चार दिवस लागणार असतील तर घाई कोणाला आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणूकीत १२ फेब्रुवारीला मतदान होऊन १२ मार्चला एका महिन्यानंतर निकाल लागला होता, याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली.




