Friday, December 13, 2024
Homeमुख्य बातम्यामलालाचे कार्य दीपस्तंभासारखे

मलालाचे कार्य दीपस्तंभासारखे

१२ जुलै हा दिवस 'जागतिक मलाला दिन' म्हणून साजरा केला जातो. कोण आहे मलाला? तिने कोणते कार्य केले? शांततेच्या 'नोबेल पुरस्कारा'ने तिला का गौरवण्यात आले? 'मलाला दिन' का साजरा केला जातो? जाणून घेऊया प्रस्तुत ब्लॉगमध्ये.

एक लहान मुलगी आपल्या कार्यकर्तृत्वातून काय करु शकते याचा वास्तूपाठ मलाला युसूफजई हिने घालून दिला आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आणि क्रूर अशा तालिबानी दहशतवाद्यांशी थेट पंगा घेणाऱ्या मलालाने जीवाची बाजी लावली. जगभर मोठा संदेश दिला. मुलींच्या शिक्षण आणि हक्कांचा ती आवाज बनली. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने १२ जुलै हा दिवस ‘जागतिक मलाला दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. या दिनानिमित्त जगभरातील लहान मुली, महिला, त्यांचे हक्क, शिक्षण या साऱ्यांची दखल घेतली जावी, त्यांना सन्मानाची वागणूक मिळतानाच हे सारे प्रश्न सुटावेत, अशीही अपेक्षा केली जाते.

पाकिस्तानातील स्वात खोऱ्यातील मिंगोरा शहरात १२ जुलै १९९७ ला मलालाचा जन्म झाला. सर्वसामान्य कुटुंबातील मलालाला लहानपणापासूनच शिक्षणाची अवड होती. त्यामुळे ती शाळेत जायची. मात्र २००७ मध्ये तालिबानने स्वात खोऱ्याचा ताबा घेतला. त्यामुळे तेथील परिस्थिती अतिशय बिकट बनली. तालिबानी कायदे आणि नियमांचे कठोर पालन करण्याचा आग्रह तालिबान्यांकडून होऊ लागला. परिणामी, स्वात खोऱ्यातील नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला. लहान मुली, तरुणी, महिला यांच्यावर अनेक प्रकारची बंधने आली. शाळेत जाणे, नृत्य यांसारख्या सांस्कृतिक कार्यात भाग घेणे, दूरदर्शन पाहणे या सर्वांवर बंदी घालण्यात आली. मलाला अवघी ९ ते १० वर्षांची होती. बंदी असूनही ती झुगारुन शाळा सुरू असल्याचे तालिबान्यांना दिसले. त्यामुळे ते अधिक आक्रमक झाले.

- Advertisement -

२००८ मध्ये त्यांनी तब्बल ४०० शाळा उदध्वस्त केल्या. आत्मघाती हल्ले, बॉम्बस्फोट यासारख्या हिंसक घटनांनी प्रचंड दहशत निर्माण केली गेली. एवढी भयावह परिस्थिती आजूबाजूला असतानाही मलाला डगमगली नाही. शिक्षण सर्वांना मिळायला हवे, असा आग्रह तिने धरला. आपल्या शाळेवर केव्हाही हिंसक हल्ला होऊ शकतो, हे माहीत असूनही ती शाळेत जात होती. अनेकांनी तिला समजावले, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. तालिबानविरोधात उभी राहतानाच शालेय शिक्षणाच्या हक्कासाठी ती लढत राहिली.

९ ऑक्टोबर २०१२ ला सकाळच्या सुमारास मलाला शाळेतून घरी येत होती. त्याचवेळी दोन तालिबानी दहशतवाद्यांनी स्कूलबसमधील मलालावर थेट गोळ्या झाडल्या. एक गोळी तिच्या डोक्याला लागली. दुसरी तिच्या खांद्यात अडकली. मलाला गंभीर जखमी झाली. तिला पेशावर येथील पाकिस्तानी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होते, पण पुढील उपचारांसाठी तिला इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

प्राणघातक हल्ल्यामुळे मलाला कोमात गेली होती. तिला अर्धांगवायूचाही झटका आला. त्यामुळे तिच्या चेहऱ्याची डाव्या बाजूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी अनेक उपचार करावे लागले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जगभरातील असंख्य नागरिकांच्या प्रार्थनेच्या जोरावर १६ ऑक्टोबर २०१२ ला मलाला कोमातून बाहेर आली. मृत्यूच्या दारातून ती परत आली; तरीही तिचा निर्धार ढळला नव्हता. सर्वांना शिक्षण मिळावे, असा निश्चय तिने केला. प्रकृती बरी झाल्यानंतर असंख्य संघटनांनी तिला सत्कारासाठी बोलावले. तिचा सन्मान केला. संयुक्त राष्ट्रानेही तिची दखल घेतली. न्यूयॉर्कमधील मुख्यालयात तिचे विशेष भाषण ठेवण्यात आले. तिचे हे भाषण प्रचंड गाजले. यापुढे शिक्षण आणि मुलींच्या हक्कासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे तिने घोषित केले. तसेच ‘आय एम मलाला: द गर्ल हू स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड वॉज शॉट बाय द तालिबान’ हे तिचे आत्मचरित्र असलेले पुस्तक प्रकाशित झाले. यातून तिने आपली संपूर्ण कहाणी विषद केली आहे. जगभरात हे पुस्तक ‘बेस्ट सेलर’ ठरले.

अनेक ठिकाणची व्याख्याने, ब्लॉगवरील लेखन, मुलाखती यातून मलालाने लहान मुलींचे भावविश्व, तालिबान्यांकडून होणारा अनन्वित छळ, असामनतेमुळे महिलांना भेडसावणाऱ्या अडी-अडचणी, शिक्षणाचे आयुष्यातील महत्त्व आदींवर प्रकाश टाकला. यानिमित्त जगभरात या प्रश्नांवर बोलले जाऊ लागले. चर्चा होऊ लागली. विशेष कार्यक्रम आयोजित होऊ लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडू लागल्या. आपल्या विचारांमधून तिने असंख्य जणांना प्रेरणा दिली. मुलींच्या शिक्षणाला भरघोस पाठिंबा दिला.

आता आणखी पुढे जायचे, असा निश्चय तिने केला. वडिल्यांच्या साथीने तिने ‘मलाला फंड’ स्थापन केला. प्रत्येक मुलीला १२ वर्षांपर्यंत मोफत, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी तिची संस्था अमूलाग्र कार्य करीत आहे. शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना बदलासाठी समर्थन देण्याचे कार्य करण्यासाठी ‘मलाला फंडा’तून आर्थिक मदत केली जात आहे. हळूहळू जगभर तिचे हे कार्य विस्तारले. शालेय शिक्षणासाठी आर्थिक संसाधने निर्माण करणे, प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे ही कार्येही सुरू झाली. तिच्या या प्रभावी आणि व्यापक कार्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली. नोबेल समितीही त्याला अपवाद ठरली नाही. २०१४ मध्ये तिला शांतता ‘नोबेल पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

आजवरच्या नोबेल पुरस्कारार्थींमध्ये ती सर्वात तरुण ठरली आहे. या पुरस्कारामुळे जगात तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. तिच्या कार्याची महती सर्वदूर पोहचली. जागतिक शांततेतही तिचे अमूल्य योगदान अधोरेखित झाले. मलालाने तिच्या आयुष्यात अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. निर्धाराने महिलांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणासाठी दहशतवादी तालिबान्यांशी लढा दिला. याचे स्मरण सर्वांना यानिमित्ताने राहणे आवश्यक आहे, म्हणूनच ‘मलाला दिन’ साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्राने जाहीर केले. आयुष्य पणाला लावून शिक्षण आणि मुलींच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या मलालाला सॅल्युट करण्याबरोबरच तिने उपस्थित केलेले प्रश्न, समस्या दूर करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. ते सर्वांनी पार पाडले तर तिचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल.

  • प्रा. भालचंद्र यशवंत पाटील,
    प्राचार्य व संचालक, यशवंत क्लासेस, नाशिक
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या