Thursday, May 7, 2026
HomeनाशिकMalegaon Bomb Blast Case : भिक्कू चौक बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल; सहा...

Malegaon Bomb Blast Case : भिक्कू चौक बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल; सहा जणांचा मृत्यू, शंभरावर नागरिक जखमी

दोषी की निर्दोष याकडे शहरासह राज्याचे लक्ष

मालेगाव | बब्बू शेख | Malegaon

शहरातील भिक्कू चौकात रमजान पर्वानिमित्त खरेदीसाठी गर्दी झाली असतांना २९ सप्टेंबर २००८ मध्ये दुचाकीव्दारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभराहून अधिक महिला-नागरीक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल मुंबई येथे विशेष एनआयए न्यायालयात आज लागणार आहे. साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहितसह सहा जण या खटल्यात आरोपी असल्याने ते दोषी ठरतात की निर्दोष याकडे शहरासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

दरम्यान, तत्कालीन दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख स्व. हेमंत करकरे यांनी या बॉम्बस्फोटाचा कसोशीने तपास करत सहा जणांना अटक केली होती. निरपराध लोक या स्फोटात मृत्यूमुखी पडले व अनेक जण जखमी झाल्याने या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांनी केली आहे. भिक्कू चौकात रमजान पर्वानिमित्त २८ वा रोजा लागल्याने खरेदीसाठी महिला व नागरीकांची गर्दी होती. रात्री ९ वाजून ३५ मिनीटांच्या सुमारास दुचाकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने परिसर हादरला होता. या स्फोटात परवीन शैख, मुस्ताक शंख, रफिक शेख, इरफान खान, अजहर सय्यद, हारून शहा या ६ लोकांचा मृत्यू तर १०१ नागरीक जखमी झाले होते.

या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडून पळापळ झाली होती. प्रारंभी स्फोट कशाचा झाला हे समजत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र स्फोटामुळे छिन्नविछीन्न झालेल्या दुचाकीमुळे हा बॉम्बस्फोट असल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक संतान झाले होते. या घटनेनंतर भिकू चौकात मोठा जमाव जमला होता, स्फोटातील जखमींना मनपासह शहरातील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रात्रीतूनच सशस्त्र पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.

स्फोटातून उडालेले छर्रे दुकानांच्या शटरला तसेच भितीवर असलेल्या घड्याळावर आदळल्याने शटरांना छिद्रे पडले तर घड्याळ फुटून बंद पडली होती. स्फोटाच्या वेळी बंद पडलेली ही घड्याळ हॉटेल चालक खलील अहमद यांनी आज देखील दुकानात लावून ठेवली आहे. या स्फोटाचा तपास दहशतवादी विरोधी पथकासह पोलिसांनी करत साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, शंकराचार्य सुधाकर धरद्वीवेदी उर्फ सुधाकर चतुर्वेदी या सहा जणांना स्फोट घडविल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात गत १७ वर्षापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती.

एकुण ३२३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येवून आरोपींना खटल्यासंदर्भात माहिती देण्यात येवून त्यांचे जबाब नोंदविले गेले होते. विशेष न्यायालयाचे न्यायमुर्ती ए.के. लाहोटी है या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देणार असून सर्व आरोपींना ३१ जुलैरोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे उद्या भिक्कू चौक बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागणार असल्याने आरोपींना दोषी ठरविले जाते की निर्दोष याकडे शहरासह राज्याचे लक्ष लागले आहे.

अधिकारी-पोलिसांवर हल्ले

भिकू चौकात बॉम्बस्फोट घडल्यानंतर सहा जणांचा मृत्यू तर शंभराहून अधिक नागरीक जखमी झाल्याने जमाव संतप्त झाला होता, यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या तत्कालीन पोलीस उपअधिक्षक विरेश प्रभू यांच्यासह इतर अधिकारी, पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांना संतप्त जमावाने हल्ला चढविला. प्रभू यांना गटारीत टाकत त्यांच्यावर दगड टाकण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी प्रसंगावधान राखत गृहरक्षक दलाच्या जवानांनी जखमी असतांना देखील त्यांना बाहेर काढत जमावाच्या तावडीतून सुरक्षीत स्थळी हलविल्याने ते बचावले. जमावाच्या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यांसह २२ गृहरक्षक दलाचे जवान व दहा ते बारा पोलीस देखील जखमी झाले होते.

न्यायासाठी कठोर शिक्षा व्हावी

भिक्कू चौक बॉम्बस्फोटात सहा जण मृत्यूमुखी पडले होते. दहा वर्षाची परवीन शेख ही बालिका वडापाव घेण्यासाठी घराबाहेर पडली असता या स्फोटात ती देखील मृत झाली. तपास अधिकारी हेमंत करकरे यांनी स्फोट घडविणारे आरोपी पकडले होते. त्यामुळे माझ्या मुलीसह इतर मृतांना न्याय मिळावा यासाठी या स्फोटात दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मृत परवीनचे वडिल लियाकत शेख यांनी दै. ‘देशदूत’शी
बोलतांना केली.

ताज्या बातम्या

Shirdi : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले साईदर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ramnath Kovind) यांनी गुरुवारी (दि.7) सपत्नीक शिर्डी येथे येऊन साईबाबा समाधी मंदिरमध्ये समाधीचे मनोभावे दर्शन (Sai...