Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : दुपारपर्यंत परवानगी न मिळाल्यास...; अंतरवालीतून निघताना जरांगेंचा मोठा...

Manoj Jarange Patil : दुपारपर्यंत परवानगी न मिळाल्यास…; अंतरवालीतून निघताना जरांगेंचा मोठा प्लॅन

मुंबई । Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज १८ वा दिवस उजाडला आहे. प्रकृती खालावत असली तरी आरक्षणाचा लढा तीव्र करत जरांगे आज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी जरांगे यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा नव्याने अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज दुपारपर्यंत पोलिसांनी अधिकृत परवानगी न दिल्यास थेट मुंबई उच्च न्यायालयात (High Court) धाव घेण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

यापूर्वी आझाद मैदान पोलिसांनी सुरक्षेचे आणि वाहतुकीचे कारण देत जरांगे पाटलांचा अर्ज दोनदा फेटाळून लावला होता. मागील आंदोलनात ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त आंदोलक जमल्याचा आणि मैदान वेळेत रिकामे न केल्याचा आक्षेप पोलिसांनी घेतला होता.

या पार्श्वभूमीवर, पोलिसांचे सर्व आक्षेप फेटाळण्यासाठी जरांगे पाटलांच्या प्रतिनिधींनी तिसऱ्या अर्जात अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. “आम्हाला आझाद मैदानावर केवळ ५० लोकांसह शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी. आम्ही पोलीस प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करू, तसेच १८ तारखेला दिलेल्या निर्धारित वेळेतच आंदोलन पार पाडू,” असे या अर्जात नमूद केले आहे.

मुंबई पोलिसांकडून या नव्या आणि तिसऱ्या अर्जावर काय निर्णय घेतला जातो, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. जर आज दुपारपर्यंत पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनास मंजुरी दिली नाही, तर जरांगे पाटील कायदेशीर मार्ग स्वीकारणार आहेत.

लोकशाही मार्गाने आणि शांततेत आंदोलन करण्याच्या हक्कासाठी ते मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन तिसऱ्या अर्जावर सकारात्मक पाऊल उचलते की हे प्रकरण न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Parag Shah : करोडपती आमदार पराग शाह ‘भिकारी’ बनून मतदारसंघात का...

0
मुंबई । Mumbai हातात ३,३८३ कोटींहून अधिक रुपयांचे साम्राज्य, आलिशान गाड्यांचा ताफा आणि अंगरक्षकांचा गराडा... पण, एका सकाळी हा सर्व लवाजमा बाजूला सारून महाराष्ट्रातील सर्वात...