Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याआत काही तरी शिजतंय? मुख्यमंत्र्यांना कोण आडवतंय?; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचं...

आत काही तरी शिजतंय? मुख्यमंत्र्यांना कोण आडवतंय?; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य

जालना | Jalana

मनोज जरांगे पाटील यांनी आपण आमरण उपोषणावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली त्याचा आम्ही आदर करतो. त्यांचा सन्मान करतो. पण आमच्याही लेकराबाळांचा प्रश्न आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? आत काय शिजतंय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

जरांगे पाटील म्हणाले, मी माझ्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहे. काही वेळाने पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन, तसेच आंदोलनाची पुढची दिशा सर्वांना सांगेन. यापुढे मराठा समाजाने आंदोलन केलं तरी ते शांततेतच होईल, परंतु ते आंदोलन सरकारला पेलवणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (मंगळवार, २४ ऑक्टोबर) छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं मराठ्यांना आरक्षण देणार. परंतु, ४० दिवसांत सरकारने काहीच केलेलं दिसत नाही. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करतो.

मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात असं सांगितलं जातं. परंतु, त्यांना कोणीतरी आरक्षण देऊ देईनात. ते लोक कोण आहेत हे आज दिवसभर शोधावं लागेल. त्यांना कोणीतरी आरक्षण देऊ देईनात की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. परंतु, आमच्या लेकरा-बाळांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी उपोषणावर ठाम आहे. मी आता उपोषणाला बसायला अंतरवाली सराटीला निघालो आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

जे टिकणारच नाही ते आरक्षण दिल्यावर ते उच्च न्यायालयात टिकणारच नाही. बाकीच्या लोकांना कशातून आरक्षण दिलं? त्या निकषात मराठे बसत नाही का? मग काय अडचण आहे? कशाला वारंवार तुम्ही कारण का सांगता? माळी समाजाचा व्यवसाय काय? विदर्भातील कुणबी समाजाचा व्यवसाय काय? त्यांना आरक्षण दिलं, ते कसं दिलं? त्यांनी किती कागदपत्र दिली? त्यांना आरक्षण देण्यासाठी तुम्ही किती समित्या नेमल्या? असे सवालच जरांगे पाटील यांनी उपस्थित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या