Friday, September 20, 2024
Homeनगरमुंडक्यावर पाय देऊन ओबीसीतून आरक्षण घेणारच

मुंडक्यावर पाय देऊन ओबीसीतून आरक्षण घेणारच

जरांगे पाटील : माझ्या मागे लावलेल्या षडयंत्राबाबत दोन दिवसांत माहिती जाहीर करू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

माझ्या पाठीमागे जे षडयंत्र लावले गेले, त्यामागे देवेंद्र फडणवीस आहे का? याची माहिती दोन दिवसांत उपलब्ध होईल, त्यानंतर ती जाहीर करू. मी मरण यातना भोगतोय, रोज 4-4 सलाईन घेतोय, पण मला माझ्या यातनांची व शरीराची चिंता नाही. मराठा समाजाच्या वेदना मी मोजतोय. त्यामुळे सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नगरमध्ये व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभा सोमवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील चौपाटी कारंजा चौकात झालेल्या सभेपूर्वी प्रमुख रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. सभेस मोठी गर्दी झाली होती. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, राज्याची सत्ता मराठ्यांच्याच हाती हवी यासाठी एकजूट दाखवा. मराठे व ओबीसी यांच्यामध्ये वाद लावून देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत, त्यांची भाषा तशीच आहे. भुजबळ अपयशी पायाचे आहेत. देवेंद्र फडणवीसच्या नादी लागून ते त्यांचे उमेदवार पाडतील.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपल्या घराला नोटीस चिकटली. गेवराईचा पोलीस उपनिरीक्षकही जातीवाद करतो आहे. विनाकारण नोटीस पाठवली गेली. माझ्यामागे इतके का लागले आहात? काय केले मी?, माझा काय दोष?, मराठा समाजाला एकत्र करतो हा माझा दोष आहे का?, सागर बंगल्यावर बसूनही त्यांची अडचण होते आहे. तुम्ही तुमचा समाज मोठा केला. परंतु त्यांचे दुखणे वेगळे आहे, मी मॅनेज होत नाही. फुटत नाही. समाज माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे, हे त्यांचे दुखणे आहे. म्हणूनच माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला, एसआयटी चौकशी नेमली. त्यांनी छगन भुजबळला फोडले, त्याच्या नेतृत्वाखाली टोळी तयार केली, त्यानेच इतर नेते गोळा केले आहेत. त्यांचा मुकादम भुजबळ झाला आहे. आता ते क्रांती मोर्चा फोडण्याचे पाप करत आहेत. इतके दिवस मुंबईकडे लक्ष दिले नव्हते.

परंतु आता द्यावे लागेल. त्यावर गेल्या चार-पाच दिवसांपासून काम सुरू आहे. प्रवीण दरेकरची कोणाबरोबर बैठक झाली, पडद्यामागे फडणवीस आहे का? याची आपल्याला दोन दिवसात माहिती मिळेल, असाही दावा त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य करून विभाग-विभागातील मराठ्यांमध्ये विष कालवले जात आहे. ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी घात केला. समाजाऐवजी पक्ष आणि नेता मोठा केला. ज्यांना मोठे केले तेच आता आरक्षण विरोधात बोलत आहेत. त्यांना डोक्यावर घेऊन चूक केली. आपण मात्र उघड्यावर आलो. जातीसाठी प्रत्येकाने एक दिवस द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. मागील लोकसभा निवडणुकीत पाडापाडी दाखवून दिली, आता पुढील निवडणुकीत नाव घेऊन पाडणार. गिरीश महाजनचा त्यात समावेश आहे. ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला, त्यांना पाडणार. मग तो कोणत्या जातीचा असो, त्याशिवाय मराठ्यांची शक्ती वाढणार नाही. मागील वेळी मुस्लिमानीही साथ दिली. निवडून आणण्यापेक्षा पाडापाडीमध्ये अधिक मजा आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले.

राहात्याकडे रवाना
रात्री उशीरा नगर उपनगरातील रॅली संपवून नियोजित पत्रकार परिषद रद्द करत जरांगे पाटील राहाता या ठिकाणी मुक्कामासाठी रवाना झाले. यावेळी त्यांना सलाईन लावून रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या