जालना । Jalana
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे खंडणी प्रकरणातील गुन्हेगार नाहीत याची मला १०० टक्के खात्री आहे. असं नामदेवशास्त्री म्हणाले होते. त्यावर आता मनोज जरांगेंनी जोरदार टीका केली आहे.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यनंतर महाराष्ट्राला जातीयवादाचा एक नवा अंक पाहायला मिळाला. कारण, आजपर्यंत आम्ही आमचा हक्क मागितला तरी आम्ही जातीयवादी ठरत आहोत. मग, अशा मोठ वलय असणाऱ्या, मोठी गडाची परंपरा असताना, साधूसंतांचा मार्ग सांगत असताना आणि ज्यांना सर्व जाती समूहाची मान्यता असताना महंतांनी अशी कुणाची बाजू कशी घ्यावी असा थेट प्रश्नही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आज महाराष्ट्रात हा एक नवा अंक तयार करण्यात आला आहे. मात्र, मला महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी जास्त दोष देऊ वाटत नाही. कारण, धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीने त्यांना हे सर्व करायला लावलं आहे असं माझं मत आहे. कारण, त्यांना दोष देण्यापेक्षा यांच्यामुळे कुणाकुणाला काय काय बोलाव लागत आहे हे आपण पाहत आहात. आज राज्यात अनेक लोक अशी बाजू घेताना किंवा काही बोलत असताना आपण पाहत आहोत असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
महंत नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज धनंजय देशमुख कुटुंबीयांसह भगवानगडावर जाणार आहे .यावर मनोज जरांगे म्हणाले, तो आता त्यांचा कुटुंब म्हणून एक भाग आहे. त्यावर आपण काय बोलावं. तसंच, सगळं जे काही बोलायचं ते बालून गेले आहेत. त्यावर आता काय भेटाव? आणि त्यावर काय बोलाव असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.