मुंबई | Mumbai
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणासाठी मराठे थेट मुंबईत धडकले. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक पाऊस, उपवास, झोपेची पर्वा न करता लढा देत आहेत. आझाद मैदानापासून ते वाशीपर्यंत मराठा आंदोलक पसरले आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरु आहेत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली होती. यानंतर मराठा उपसमिती पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी दुसर्या बाजूला भाजपच्या नेत्यांकडून या आंदोलनावर प्रहार सुरु झाला आहे. आमदार संजय केनेकर, मंत्री निलेश राणे आणि इतर भाजप नेत्यांनी त्यांचा रोख स्पष्ट केला आहे. त्यात आता या बड्या भाजप नेत्याने तर थेट हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणावर आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा मोठे भाष्य केले आहे. त्यांनी मराठा आंदोलकांना खडे बोल सुनावले. त्यांनी भाजपची बाजू जोरकसपणे मांडली. हे मुद्दे मांडत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांवर टीकास्त्र सोडले. आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत. आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही अन्यथा नवीन वाद तयार होईल, असे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
सग्यासोयरेबाबत अध्यादेशही निघालेला आहे आणि आपल्या पितृ सत्ता समाजाच्या नियमानुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात. अशा सगळ्या सोयऱ्यांना दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकाला दाखला मिळतो त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील दहा जणांना याचा फायदा होतो, याचा विचार करता लाखो समाज बांधवांना आता कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंना टोला
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे कधीही खोटे बोलत नाहीत मात्र काही लोक नेहमीच खोटे बोल पण रेटून बोल असे करीत असल्याचा टोला लगावला. सध्या सुरू असलेले आंदोलन हे मुंबईकरांना वेठीस धरण्याचे काम आहे. हे राजकीय आरक्षण मिळवण्याची धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडीटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
जात मागास ठरवण्याचे अधिकार घटनेने केवळ मागासवर्गीय आयोगाला दिलेले आहेत, ते शिंदे समिती ठरवू शकत नाही. गावच्या सरपंच पदासाठी आणि राजकारणासाठी हे सर्व सुरू असून पूर्वी दिलेल्या एसईबीसीमध्ये राजकीय आरक्षण नसल्यानेच आता राजकीय आरक्षणासाठी ही धडपड सुरू आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी…
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी तामिळनाडू प्रमाणे का आरक्षण दिले नाही ही फक्त वेळ काढायचे म्हणजे धकविण्याचे आहे. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात असून ते सर्वोच्च न्यायालयात टिकणारे नाही. सुनावणीला आल्यावर हेही समोर येईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात फरक आहे तो देवेंद्र फडणवीस खरे असूनही बोलायचे टाळतात आणि अजितदादा जे काय आहे ते ठोकून बोलतात आणि म्हणूनच त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




