
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आझाद मैदानावर उपोषण (Maratha Reservation Protest Azad Maidan) करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले असून, शहरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच काही ठिकाणी आंदोलकांकडून (Protester) हुल्लडबाजी होत असल्याचेही आरोप केले जात आहेत. त्यानंतर आता मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे पाटील यांनी मराठा बांधवांचे कान टोचत कळकळीचे आवाहन केले आहे. पोलिसांना सहकार्य करा, शिस्त आणि संयमाचं पालन करा, दारु पिऊन आलात, तर हे आपले मावळे नाहीत, असं आम्ही समजू, असे काळकुटे पाटील म्हणाले आहेत.
काय केलं मराठा बांधवांना आवाहन?
“मी सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की, आपल्या समाजाचं दैवत, मनोज दादा आपल्या समाजासाठी, तुमच्या-आमच्यासाठी रात्रंदिवस लढत आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आदल्या दिवशीही त्यांनी काही खाललं नव्हतं, त्यांची तब्येत खराब आहे, अशात आपण जर चुकीचं वागायला लागलो, रस्त्यात हुल्लडबाजी करायला लागलो, दारु पिऊन यायला लागलो, तर हे आपले मावळे नाहीत. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे, रस्ते अडवले नाही पाहिजेत, रस्त्यावर कचरा टाकला नाही पाहिजे, मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आपण जी शिस्त आणि शांतता दाखवून दिली, ती अपेक्षित आहे.
मनोज दादा रोज सकाळ संध्याकाळ सगळ्या महाराष्ट्राला आणि मराठा बांधवांना आवाहन करत आहेत, आणि इथे येणारे आपणच जर गाणं वाजवत असू, डीजेवर नाचत असू, तर मनोज दादांच्या मनाला काय वेदना होत असतील, याचा विचार करा. पोलीस बांधवांना कुठलाही त्रास होता कामा नये, पत्रकार बांधवांच्या बाबत एक घटना घडली, त्याबद्दल आम्ही जाहीर माफी मागितली आहे, तसं वर्तन कुणी पुन्हा करु नये, मुंबईकरांना त्रास होता कामा नये, रस्ते अडवू नका, रेल्वेला अडथळा निर्माण करु नका, मुंबईकर जिथे मिळेल तिथे जागा देत आहेत, सहकार्य करत आहेत, पण तुम्ही-आम्ही त्या गोष्टीची जाणीव ठेवायला हवी, मराठा समाज आणि मनोज दादाची इज्जत गेली नाही पाहिजे” असं, गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले आहेत.




