Wednesday, July 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : दिल्लीतील लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर...

Rahul Gandhi : दिल्लीतील लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; केल्या ‘या’ तीन प्रमुख मागण्या

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीमध्ये (Delhi) शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून आणि नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी या घटनेचे व्हिडीओ आणि पुरावे दाखवत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारला घेरले.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “माझ्यासोबत काय व्यवहार झाला याची मला पर्वा नाही. माझ्यासोबत असा प्रकार आणखी पाच वेळा झाला तरी मी मागे हटणार नाही. पण विद्यार्थ्यांच्या (Student) भविष्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे आणि आमचा हा लढा असाच सुरू राहील” असे राहुल गांधींनी म्हटले.

दरम्यान, मंगळवारी (दि. २१ जुलै) रोजी पंतप्रधान निवासस्थानासमोर साडेतीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी यांनी आता काही मागण्यांद्वारे आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाला आणि कॉकरोच जनता पार्टीसह (CJP) काँग्रेस पक्षाला मिळणारा पाठिंबा पाहता, आता केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लाठीचार्जचे व्हिडीओ दाखवत उपस्थित केले प्रश्न

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पोलिसांकडून विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचे व्हिडीओ दाखवले. बंदुकीतून झालेल्या फायरिंगमध्ये एका तरुणाच्या अंगावर छर्रे लागल्याचे दाखवत राहुल गांधी यांनी “या विद्यार्थ्यांची चूक काय होती? ते फक्त शिक्षणातील सुधारणा आणि न्याय मागत होते. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर असा अत्याचार का करण्यात आला? असा सवाल उपस्थित केला.

दहा वर्षांत १५२ पेपर फुटले, पण एकालाही शिक्षा नाही

शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवताना राहुल गांधी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत १५२ पेपर लीक झाले आहेत. यामुळे सुमारे ५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य टांगणीला लागले असून नैराश्यातून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. एवढे होऊनही गेल्या दहा वर्षांत एकालाही कडक शिक्षा झालेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.

४०-५० लाख रुपये मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवताना राहुल गांधी म्हणाले की, दिवस रात्र ८ ते १० तास प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रचंड अन्याय होत आहे. त्यांच्याऐवजी ४० ते ५० लाख रुपये मोजणाऱ्या भ्रष्ट लोकांना मागच्या दराने संधी दिली जात आहे. देशातील तरुण हे दहशतवादी नाहीत, तरीही त्यांच्यावर पेलेट गन चालवून अमानुष अत्याचार केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

नीट परीक्षेतील खर्चावर तीव्र नाराजी

नीट परीक्षेतील आर्थिक गणितावर बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थी नीटच्या तयारीसाठी सुमारे १.३२ कोटी रुपये खर्च करतात, तर शैक्षणिक बजेट १.३ लाख रुपये आहे. एवढा मोठा खर्च करूनही पेपर लीक होत असतील, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळ सुरू आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

केंद्र सरकारकडे राहुल गांधींच्या ३ प्रमुख मागण्या

१. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.
२. पंतप्रधानांनी माफी मागावी : विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी.
३. दोषींवर कारवाई : आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना जबाबदार धरावे.

ताज्या बातम्या

Nashik BJP News : कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन ढोंगी – भाजप...

0
नाशिक | Nashik दिल्लीत नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पक्षाच्या (Cockroach Janata Party) वतीने करण्यात आलेले आंदोलन हे पूर्णपणे 'ढोंगी'...