जालना । Jalana
मराठा आरक्षणाच्या उपोषणाचा आज आठवा दिवस उजाडला असून, अंतरवाली सराटीतील राजकीय व सामाजिक वातावरण पुन्हा एकदा अत्यंत तणावपूर्ण आणि संवेदनशील बनले आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी न केल्याचा गंभीर आरोप करत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री ११ वाजेपासून पाणी, औषधे आणि सलाईन घेण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त करत जरांगेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याने सत्ताधाऱ्यांवरील दबाव कमालीचा वाढला आहे.
दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या बैठकीत ‘शरद पवार आणि महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी काय केले?’ असा सवाल विखे पाटलांनी केला होता. त्यावर जरांगेंनी कडाडून हल्ला चढवला. “मराठा समाजाने भाजपला भरघोस मतदान करून सत्तेत बसवले. मग आम्हालाच प्रश्न विचारण्याची वेळ सरकारच्या मंत्र्यांवर का येत आहे? पवार आणि मविआने काय केले हे विचारण्यापेक्षा फडणवीस आणि भाजप सरकारने मराठ्यांसाठी काय केले, याचे उत्तर द्या,” असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवताना जरांगे म्हणाले, “शासनाने मराठा समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र दिले आणि नंतर तेच रद्द करण्याचे काम केले. ही माघार मराठा समाजाच्या चांगलीच लक्षात आली आहे.” सातारा आणि कोल्हापूर गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला तातडीने कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत शासन निर्णय (GR) जारी करावा, या मागणीवर सरकार अजूनही टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला.
आपले आंदोलन पूर्णपणे लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने सुरू असल्याचे स्पष्ट करत जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला. “मागील आंदोलनांप्रमाणे यावेळी मराठा तरुणांवर काठी चालवण्याचा किंवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका; अन्यथा मराठा समाज आपली खरी ताकद दाखवून देईल,” असा इशारा त्यांनी दिला. सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून उपचार सुरू केले होते, मात्र दिलेला शब्द न पाळल्याने पुन्हा उपचार नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता अंतरवाली सराटीकडे लागले आहे.




