मुंबई | Mumbai
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि भारतीय सिनेसृष्टीसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी ऑस्कर २०२७ साठी भारताकडून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी मुंबईत ही घोषणा केली. महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककलेवर आणि धार्मिक विधीवर आधारित हा चित्रपट आहे.
संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स निर्मित ‘गोंधळ’ या चित्रपटाने आपल्या अद्वितीय कथानकाने आणि सशक्त सादरीकरणाने चित्रपट परीक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या अस्सल लोकपरंपरेवर आणि ग्रामीण संस्कृतीतील अंतर्गत संबंधांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून आधीच कौतुक केले गेले आहे.
देशभरातील ३० हून अधिक दिग्गज चित्रपटांमधून ‘गोंधळ’ ने मारली बाजी
देशभरातील ३० हून अधिक दिग्गज चित्रपटांमधून दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या या पहिल्याच चित्रपटाने बाजी मारली आहे. ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती. या विविध आणि तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ची निवड झाली आणि भारताचे अधिकृत ऑस्कर प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान चित्रपटाला मिळाला.
निठारी कांडातून निर्दोष सुटलेल्या सुरेंद्र कोलीची आत्महत्या; चहाच्या टपरीत आढळला मृतदेह
धार्मिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीवर घडणारे कौटुंबिक नाट्य
चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, आणि सुरेश विश्वकर्मा यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक ‘गोंधळ’ हा धार्मिक-सांस्कृतिक विधी आणि त्याच्या पार्श्वभूमीवर घडणारे कौटुंबिक नाट्य व रहस्यमय वळणे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत.
‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांना यापूर्वीच या चित्रपटासाठी मोठा सन्मान मिळाला आहे. ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कार मिळाला होता. IFFIच्या अधिकृत नोंदीनुसार ‘गोंधळ’चा समावेश २०२५च्या इंडियन पॅनोरमा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही करण्यात आला होता.
ऑक्सरला जाणारा चौथा मराठी चित्रपट ठरला गोंधळ
मराठी चित्रपटसृष्टीतून दिग्दर्शक संतोष डावखर आणि संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘श्वास’, ‘कोर्ट’ आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ यांसारख्या चित्रपटानंतर ऑस्करच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा ‘गोंधळ’ हा आणखी एक महत्त्वाचा मराठी चित्रपट ठरला आहे. आता जागतिक स्तरावर हा चित्रपट ऑस्करची ट्रॉफी पटकावण्यात यशस्वी ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१४ मार्च २०२७ रोजी होणार ऑस्कर सोहळा
९९वा अकादमी पुरस्कार सोहळा १४ मार्च २०२७ रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. त्याआधी ‘गोंधळ’ला Best International Feature Film विभागातील पुढील निवड प्रक्रियेतून जावे लागेल. मराठी मातीत रुजलेल्या लोकपरंपरेला केंद्रस्थानी ठेवणारा ‘गोंधळ’ आता भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून जागतिक चित्रपटविश्वाच्या व्यासपीठावर पोहोचला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही निवड विशेष महत्त्वाची ठरली आहे.




