राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानिया सुहास विधाटे, (वय 19) हल्ली रा. सडे, ता. राहुरी या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, तिचा विवाह 26 मे 2024 रोजी सुहास उत्तम विधाटे, रा. लोणी, ता. राहाता याच्या सोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवस सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर तुला स्वयंपाक येत नाही, तू आवडत नाही, जादूटोणा करते, असे आरोप लावून त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली.
तसेच लाथा बुक्क्याने मारहाण करुन उपाशी पोटी ठेवून शारीरीक व मानसीक त्रास देत होते. दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सानिया हिचा पती सुहास उत्तम विधाटे हा म्हणाला, तू तुझ्या आई-वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये, मला कर्जाच्या पैशाचा भरणा करायचा आहे. तेव्हा सानिया त्याला म्हणाली, माझे आई वडील गरीब आहे, ते दोन लाख रुपये कोठून आणणार? असे म्हणाले असता, त्याने सानिया हिला काठीने मारहाण केली. तेव्हा घरातील इतर लोक म्हणाले, पैसे घेवून येत नाही, तोपर्यत तुला घरात घेणार नाही, असे म्हणून त्यांनी सानिया हिला घरातून हकलून दिले.
फिर्यादीवरून पती सुहास उत्तम विधाटे, सासू सुशिला उत्तम विधाटे, नणंद सुनीता उत्तम विधाटे, भाया सुनील उत्तम विधाटे, जाऊ जयश्री सुनील विधाटे, सर्व रा. लोणी, ता. राहाता या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. 9/2025 भारतीय न्याय संहिता कलम 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 85, 86 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.